बऱ्याचदा कामाच्या व्यापातून स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला किंवा वेगळ्या पदार्थांची चव चाखता यावी म्हणून ऑनलाइन जेवणाची ऑर्डर केली जाते. स्वीगी, झोमॅटो सारख्या ऑनलाइन अँपच्या माध्यमातून हव्या त्या पदार्थांची ऑर्डर करता येणे आता सहज शक्य झाले आहे. मराठी मालिका अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने देखील स्वीगीच्या मध्यमातून तिरामीसु या इटालियन डेझर्टची ऑर्डर केली होती. ऑर्डर दिल्यानंतर १ तास उलटल्यानंतरही तिने केलेली ऑर्डर पोहोचली नाही. डिलीव्हरी बॉयशी संपर्क करून तिने आपल्या पार्सलबद्दल चौकशी केली. मात्र ऑर्डर केलेले पार्सल चोरी झाल्याचे त्याने तिला सांगितले.
सुरुवातीला गौतमीला त्या डिलीव्हरी बॉयबद्दल शंका आली, तो खोटं बोलत असल्याचे वाटल्याने तिने जाब देखील विचारला. तिला त्याच्या म्हणण्यावर अजिबात विश्वास नव्हता. पण नंतर त्याने आपल्या जवळचे पार्सल कसे चोरीला गेले याचा व्हिडीओ गौतमीला सेंड केला. गौतमीला पाठवलेल्या व्हिडिओमध्ये डिलीव्हरी बॉय खरं बोलत असल्याचे तिच्या लक्षात आले. एका पेट्रोल पंपावर डिलीव्हरी बॉयने आपली गाडी उभी केली होती. गाडीपासून जराशा अंतरावर तो दूर गेलेला या व्हिडिओत पाहायला मिळतो. डिलीव्हरी बॉय दूर गेलेला पाहून गाडीजवळ असलेल्या दोन तरुणांनी स्वीगीच्या बॅग मधून पार्सलची चोरी केली आणि ते पार्सल घेऊन तिथून पळ काढला. डिलीव्हरी बॉयच्या हे लक्षात न आल्याने तो या चोरीपासून अनभिज्ञ होता.
गौतमीची ऑर्डर देऊ शकत नसल्याचे कारण सांगितले. मात्र या प्रकरणासंबंधी अधिक चौकशी केल्यानंतर पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर पार्सल चोरी झाल्याचे उघड झाले. चोरी करणाऱ्या दोन तरुणांचे चेहरे व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत.चोरी करताना ते दोघेही हसतानाही दिसत आहेत, हे पाहून गौतमीचा राग अनावर झाला. हा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. यासोबतच या घटनेबद्दल सविस्तर माहिती देखील दिली आहे. एखाद्याचे जेवण असे चोरणे आणि त्यावर हसणे हे या लोकांसाठी किती लज्जास्पद आहे. असे म्हणत तिने त्या दोघा तरुणांवर आपला संताप व्यक्त केला. स्वीगीला टॅग करून तिने ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी गौतमीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करावी असे मत व्यक्त केले जात आहे.