बहुप्रतिक्षित वेड हा मराठी चित्रपट येत्या ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुखच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीसाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची तेवढीच उत्सुकता आहे. अर्थात वेड चित्रपट मजीली या दाक्षिणात्य चित्रपटावर आधारित आहे हे रितेशने देखील जाहीर केलेले आहे. चित्रपटातून प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहायला मिळेल असेही आश्वासन त्याने दिले आहे. एका पत्रकार परिषदेत वेड चित्रपटाच्या निमित्ताने रितेशला याबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा नागा चैतन्य आणि समंथा रूथ प्रभूची प्रमुख भूमिका असलेल्या मजीली चित्रपटावर आधारित असल्याचे त्याने कबूल केले आहे.

वेड चित्रपटातील अजय अतुल यांचे संगीत प्रेक्षकांना वेड लावल्याशिवाय राहणार नाही असेही म्हटले आहे. अजय अतुल यांच्या संगीताची जादू प्रेक्षकांनी नेहमीच अनुभवली आहे. आम्ही ओरिजनल गाणी बनवतो मात्र आजकाल त्या गाण्यांचे रिमिक्स केले जाते, ही गोष्ट पटत नसल्याने त्यांनी नाराजी दर्शवली होती. आमची गाणी तसेच संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात म्हणूनच ती आवडतात, असे अजय अतुल यांचे म्हणणे आहे. मजीली हा चित्रपट ज्यांनी पाहिलाय त्यांना वेड चित्रपट कसा असेल याची कल्पना आलेली आहे. सत्या ज्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतो, तिच्या विरहाने तो पूर्णपणे खचून गेलेला असतो. मात्र जिच्यावर त्याने प्रेम केलेलं असतं तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न होते.

एका अपघातात तिचे आणि तिच्या नवऱ्याचे निधन होते. मात्र तिची मुलगी सत्याच्या आयुष्यात आल्यानंतर त्याचे संपुर्ण आयुष्यच बदलून जाते. मजीली चित्रपटात मीराची भूमिका बालकलाकार अनन्या अग्रवाल हिने साकारलेली असते. आता वेड चित्रपटात मिराची भूमिका बालकलाकार खुशी सचिन हजारे हिने साकारलेली पाहायला मिळणार आहे. खुशी हजारे ही बालकलाकार हिंदी मराठी चित्रपटात काम करताना दिसली आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या आपडी थापडी चित्रपटात ती झळकली होती. याअगोदर ती अशोक सराफ यांच्या प्रवास चित्रपटात देखील बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसली. सरबजीत, भूत, मिली अशा बॉलिवूड चित्रपटातूनही महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली आहे.
खुशीने जाहिरात क्षेत्रात देखील काम केलेले आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया सोबत तिला वेड चित्रपटातून पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली. ही मीरा सत्याचे आयुष्यच बदलत नाही तर श्रावणीला देखील त्याच्या आयुष्यात पत्नीचे स्थान मिळवून देताना दिसणार आहे. त्यामुळे खुशीची भूमिका तेवढीच महत्वाची मानली जाते. या तिघांची जुळून आलेली केमिस्ट्री आणि अभिनेत्री जिया शंकर हीचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३० डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.