ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने लावणीचा सूर हरपला अशी खंत त्यांच्या तमाम चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. खरं तर लावणी म्हटलं की सुलोचना चव्हाण यांच्या गाण्यांशीवाय अपूर्णच मानली जाते. कारण त्यांच्याच आवाजातील ठसकेबाज गाण्यांनी लावणी कलाकारांनी जगभर आपल्या मराठमोळ्या कलेचा डंका मिरवलेला असतो. नाव गाव कशाला पुसता, मला हो म्हणतात लवंगी मिरची, खेळताना रंग बाई होळीचा. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्याचं, पाडला पिकलाय आंबा, फड सांभाळ तुऱ्याला गं आला.
कसं काय पाटील बरं हाय का अशा ठसकेबाज गाण्यांनी लावणीला एक वेगळाच रंग चढला होता. याचमुळे त्यांना लावणी सम्राज्ञी असेही संबोधले गेले. सुलोचना चव्हाण यांना काही महिन्यांपूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र वयाच्या नव्वदीत कलाकारांना हा सन्मान देण्यापेक्षा योग्य वेळी मिळावा अशी मागणी मुलगा विजय चव्हाण यांनी केली. मिडियाशी संवाद साधताना सुलोचना चव्हाण यांच्या मुलाने ही खंत व्यक्त केली. विजय चव्हाण हे आपल्या आईला गुरू मानत असत. त्यांच्या निधनाने विजय पुरते खचून गेलेले दिसले. ज्या काळात लावणीला सन्मान मिळत नव्हता त्या काळात माझ्या आईने या कलेसाठी गाणी गायली. लावणीला मान सन्मान मिळवून दिला. आईने केलेल्या कामाची पावती तिला खूप उशिरा मिळाली.
माझी शासनाला हात जोडून विनंती आहे की, कुठल्या कलाकाराचा तुम्हाला जर सन्मान करायचा असेल तर तो ज्या त्या वेळेतच करावा. गेल्या काही वर्षांपासून सुलोचना चव्हाण अंथरुणाला खिळून होत्या. घरात घसरून पडल्यामुळे त्यांच्या कंबरेचे हाड मोडले होते. वृद्धापकाळाने त्यांची स्मृती देखील गेलेली होती. त्यामुळे पद्मश्री पुरस्कार स्विकारण्याच्या वेळी हा पुरस्कार मला का दिला जातोय? आणि तो कोणाकडून मिळतोय? हेही तिला कळत नव्हते. उतार वयात मिळालेल्या पुरस्काराचे महत्व त्याच्यासाठी काय उरणार. सुलोचना चव्हाण यांना चालताही येत नव्हतं, त्यांना हा पुरस्कार घेण्यासाठी व्हीलचेअरवरून आणलं होतं. त्यामुळे कलाकाराचा सन्मान योग्य वेळीच करावा अशी मागणी त्यांनी मिडियाशी बोलताना केली आहे.