मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्न सोहळ्याला उधाण आलेले पहायला मिळाले आहे. जिथे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाचा सोहळा खूप गाजला तिथे आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले यांनी देखील लग्नाचा घाट घातला. मालिका सृष्टीतील या कलाकारांची लग्न सेलिब्रिटींनी देखील अटेंड केलेली पाहायला मिळाली. यांच्याच जोडीला ती परत आलीये मालिकेतील नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी देखील लग्नाची गाठ बांधली. कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्री अमृता उत्तरवार आणि विशाल बोनगीरवार यांनी देखील लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मराठी सृष्टीत गेल्या काही वर्षांपासून स्थिरस्थावर असलेल्या अमृताने २६ नोव्हेंबर रोजी विशाल बोनगीरवार सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर येथे धुमधडाक्यात हा लग्नाचा सोहळा पार पडला. अमृता उत्तरवार ही मूळची पुसदची आहे. खरं तर विदर्भातून आलेल्या कलाकारांनी मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख जपली आहे, त्यात अमृताचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. कॉलेजमध्ये असल्यापासून अमृताला अभिनयाची ओढ लागली होती. अमरावती युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर तीने काही काळ नोकरी देखील केली. पण नोकरीत फारसे मन रमेना म्हणून मग हौशी नाटक, प्रायोगिक नाटक करतानाच पाऊले मुंबईच्या दिशेने वळवली. युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले या नाटकातून तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
मनोधैर्य या चित्रपटात तिने किशोरी शहाणे सोबत मुख्य नायिकेची भूमिका देखील साकारली होती. अल्पावधीतच या पुसदच्या कन्येने तब्बल दहा चित्रपट आणि तीन नाटकांमधून काम करून आपले नाव यशाच्या शिखरावर पोहोचवले. साऊ माझी सौभाग्याची, त्या चार योनींची गोष्ट, आयुष्य, घेतला वसा टाकू नको, झिप्रु, नकळत सारे घडले, श्री गुरुदेव दत्त, who is she, बाळू मामाच्या नावानं चांगभलं, गाथा नवनाथांची अशा चित्रपट, नाटक, शॉर्टफिल्म आणि मालिकांमधून अमृताने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. ह्यावर्षी मे महिन्यात अमृता आणि विशालने साखरपुडा केला होता. चंद्रपूर येथे मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या समवेत त्यांनी लग्नाची गाठ बांधली. यावेळी मालिकेतील तिच्या सहकलाकारांनी देखील उपस्थिती लावली होती.