२६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाले. ते आंबेडकर द लेजंड या वेबसिरीज साठी काम करत होते. वेबसरीजचे दोन एपिसोड शूट करण्यात आले, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागली होती. द रायझिंग अँड कोटाचे दिग्दर्शक संजीव जयस्वाल यांनी या वेब सिरीजबाबत आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अनपेक्षित निधनानंतर ही वेबसिरीज त्यांना आता थांबवावी लागणार आहे. या मालिकेत विक्रम गोखले मुख्य भूमिकेत होते. विक्रम सरांसोबतचा संजीवजी यांचा पहिला प्रोजेक्ट लखनऊमध्ये शूट झाला होता. त्यात त्यांनी प्रोफेसरची भूमिका केली होती.
याबाबत अधिक बोलताना जयस्वाल म्हणतात की, या वेबसिरीजचे दोन भाग चित्रित करूनही त्यांना हा प्रकल्प आता रखडवावा लागणार आहे. मला विश्वास आहे की, बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारणाऱ्या विक्रमजीं शिवाय मला प्रकल्प रद्द करावा लागेल, हे माझ्यासाठी खूप अशक्य वाटते. मी हा प्रोजेक्ट पुन्हा नव्याने सुरु करू शकतो पण ते माझ्यासाठी तेवढंच कठीण असेल. विक्रमजींनी गेल्या वर्षी आमच्यासाठी मुंबई लेगसाठी अंदाजे दोन एपिसोड शूट केले होते. उर्वरित भाग शूट करण्यासाठी आम्ही लखनऊमध्ये सेट तयार करणार होतो. जेव्हा मी बाबा साहेबांवरील माझ्या स्क्रिप्टची संकल्पना त्यांच्यासमोर मांडली, तेव्हा त्यांना ही स्क्रिप्ट खूप आवडली आणि उत्साहित होऊन ही भूमिका करण्याचे त्यांनी स्वीकारले होते.
आम्ही काम करायला सुरुवात केली, त्यानंतर ते आजारी पडले. पायाच्या दुखापतीदरम्यान एक समस्या उद्भवली जी खूप वाढत गेली आणि तेव्हापासून त्यांना वारंवार आरोग्याच्या समस्याने घेरले गेले. दरम्यान त्यांनी काही मराठी चित्रपटासाठी शूट केले होते. मी त्यांच्या संपर्कात होतो पण तब्येतीच्या कारणास्तव शूट करण्याची परवानगी दिली जात नव्हती. विक्रम गोखले या प्रकल्पासाठी खूप उत्सुक होते पण ते पूर्णत्वास येऊ शकले नाही. परंतु आता त्यांच्या निधनानंतर हा प्रोजेक्ट मी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही भूमिका त्यांच्यासाठीच होती, मात्र आता ते नसल्यामुळे मी यावर पुढे काम करणार नाही. ती भूमिका दुसऱ्या कोणत्या कलाकाराने साकारावी याची मी आता कल्पना सुद्धा करू शकत नाही.