माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत लवकरच अपेक्षित घडामोडी घडताना दिसणार आहेत. मालिकेत अनुष्का हीच नेहा आहे आणि तिला आपल्या पूर्वायुष्यातील घटना आठवणीत याव्यात म्हणून यश आणि समीर प्रयत्न करत आहेत. नुकतेच हे दोघेही वेश बदलून अनुष्काच्या घरी गेले होते. अनुष्काने चौधरी कुटुंबाबद्दल आणि नेहाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेहा आपल्यासारखीच दिसते हे तिला आता समजले आहे, त्यामुळे यशचे म्हणणे तिला पटले आहे. नेहाची स्मृती लवकरात लवकर परत यावी अशी अपेक्षा प्रेक्षकांनी देखील केली आहे. एकीकडे यश नेहाला परत मिळवण्यासाठी धडपडत आहे, मात्र दुसरीकडे सिम्मी काकू रेवतीला आपली सून बनवण्याच्या प्रयत्नात आहे.
यशबरोबर लग्न करण्यासाठी सिम्मी रेवतीला आमिष दाखवते, त्यामुळे रेवती देखील सिम्मीचा प्रस्ताव स्वीकारते. आता तर रेवती चौधरींच्या पॅलेसमध्ये राहून परीचं मन जिंकत आहे. नेहाची साडी नसल्याने यश रेवतीवर प्रचंड चिडतो. नेहाच्या कपड्यांना हिने हात का लावला म्हणून यशने गोंधळ घातला तेव्हा नेहमीप्रमाणे सिम्मी काकूने ही जबाबदारी स्वतःकडे घेतली. त्यामुळे रेवती यशच्या मनात जागा बनवणार का हे येत्या काही दिवसात कळेल. तूर्तास रेवतीची भूमिका साकारणाऱ्या नुपूर दैठणकर हिच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. नुपूर दैठणकर हिने झी मराठीच्याच बाजी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या ऐतिहासिक मालिकेत तिने हिराची प्रमुख भूमिका साकारली होती.
नुपूरचे बालपण आणि संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले. तिचे आई वडील दोघेही कलाक्षेत्राशी निगडित आहेत. वडील धनंजय दैठणकर हे सुप्रसिद्ध तबला वादक तसेच संतूर वादक आहेत. तर नुपुरची आई डॉ स्वाती दैठणकर या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. जगभरात भरतनाट्यमचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. देशभरातच नव्हे तर अगदी प्रदेशात देखील त्यांनी मोठमोठे कार्यक्रम सादर केले आहेत. नुपूरनाद या नृत्यालयाची त्यांनी स्थापना केली असून यात देश विदेशातील अनेक कलाकारांनी नृत्याचे धडे घेतले आहेत. मराठी सृष्टीतील बऱ्याचशा अभिनेत्रींनी त्यांच्या नृत्यालयातून भरतनाट्यम शिकले आहे. त्यात अभिनेत्री अदिती द्रविड हिचेही नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
आपले पहिले गुरू हे आपले आईवडीलच आहेत ही नुपूरसाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. बालपणापासूनच नुपुरने नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. अभिनव विद्यालय आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासोबतच नुपुरने नृत्यामध्ये विशारद आणि अलंकार पदवी प्राप्त केली आहे. नालंदा नृत्यालयातून तिने मास्टर्सची डिग्री मिळवली. निपुरनाद या त्यांच्या डान्स अकादमीचा विस्तार वाढला आहे. त्याची जबाबदारी या दोघी मायलेकींनी समर्थपणे पेलली आहे. सौरभ बाग सोबत नुपूरचे लग्न झाले असून त्यांना रेयांश हा गोंडस मुलगा देखील आहे. आपल्या कलेला वाव मिळावा अशी भूमिका तिच्या वाट्याला आल्याने माझी तुझी रेशीमगाठ मालिकेसाठी तिने आपला होकार कळवला.