मराठी सृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपट बनवण्यासाठी चढाओढ लागलेली पहायला मिळते. आता या यादीत विराजस कुलकर्णी सारख्या नवख्या दिग्दर्शकाने भयपट बनवून एक वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला आहे. पाश्चिमात्य देशात तर भयपटांना अनन्य साधारण महत्व दिले जाते. हिंदी चित्रपट सृष्टीत देखील थरकाप उडवणारे अनेक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तुलनेने मराठी सृष्टीत असे खूप कमी भयपट येऊन गेले. त्यात तुंबाड चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली पसंती मिळवून दिली होती. विराजस कुलकर्णीचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट व्हिक्टोरिया येत्या १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
व्हिक्टोरिया चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली कुलकर्णी, आशय अनिल कुलकर्णी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर पुष्कर जोग आणि हिरा सोहल यांची भूमिका सस्पेन्स वाढवणारी ठरली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर प्रस्तुत गुजबम्प एंटरटेनमेंट निर्मित व्हिक्टोरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन विराजस कुलकर्णी आणि जित अशोक यांनी केलं आहे. चित्रपटाचे कथा लेखन देखील या दोघांनी ओंकार गोखले सोबत केलेले आहे. व्हिक्टोरिया हा एक भयपट असून त्यात उत्कंठा वाढवणारे कथानक असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजात धडकी भरवणार अशी शाश्वती ट्रेलर पाहून मिळते. मराठी प्रेक्षकांना नेहमीच नवं, आधी न बघितलेलं हवं असतं, ते त्यांना द्यायचा आमचा हा प्रयत्न!.
व्हिक्टोरिया चित्रपट प्रेक्षकांना थिएटर मध्ये जाऊन पाहायला नक्की आवडेल असा विश्वास विराजसने प्रेक्षकांना दिला आहे. पुष्कर जोग एका वेगळ्या भूमिकेत दिसत असल्याने त्याची चॉकलेट बॉयची इमेज इथे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळाली. चित्रपटात अनेक थरारक दृश्य आहेत जे प्रेक्षकांची धडकी भरवणारे ठरले आहेत. उत्कंठा वाढवणारे कथानक असल्याने चित्रपटाचा सस्पेन्स लेखकाने राखून ठेवलेला आहे. व्हिक्टोरिया हॉटेलमध्ये थरारक घटना घडतात ज्याचा संबंध थेट रेणुकाशी जोडला आहे. रेणुका हयात नाही पण तिच्या असण्याची चाहूल नायिकेला लागते. या सर्व घटनांमागे रेणुकाचा हात आहे हे तिला जाणून घेण्याची ईच्छा असल्याने नायिका व्हिक्टोरिया हॉटेलमध्ये थांबते. या हॉटेलच्या रहस्याचा उलगडा प्रेक्षकांना १६ डिसेंबर रोजी चित्रपटगृहातून पाहायला मिळेल.