हल्लीच्या पिढीला प्रि वेडिंग शूटचं मोठं वेड आहे. अर्थात आपलं लग्न तेवढ्याच खास पद्धतीनं पार पडावं ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र या प्रिवेडिंगच्या नादात बहुतेक जण आपली संस्कृती विसरण्याचा प्रयत्न करतात. आजच्या तरुणाईमध्ये बीचवर जाऊन समुद्रात डुबक्या मारत अगदी तोकड्या कपड्यांमध्ये हे प्रिवेडिंग शूट केलेलं दिसतं. ही गोष्ट ऐन लग्नात पाहणाऱ्याला देखील लाजिरवाणी वाटते. परंतु अशा परिस्थितीची जाणीव ठेवणाऱ्या एका जोडप्याने हटके अंदाजात प्रिवेडिंग शूट करून सगळ्यांची मनं जिंकली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील शार्दूल आणि मोनिकाचे हे प्रिवेडिंग शूट याच कारणामुळे सर्वत्र चर्चेत आलं आहे.
शार्दूल पेंढारकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत आहे. तर त्याची होणारी पत्नी मोनिका गोळे ही शिवकालीन मर्दानी खेळात पारंगत आहे. मोनिकाने शिवकालीन युद्धकलेचा वारसा जपत अनेक कार्यक्रमातून प्रात्यक्षिकं सादर केली आहेत. २२ मे रोजी शार्दूल आणि मोनिकाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर हे दोघेही लग्नाच्या तयारीला लागले. लवकरच या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे, त्यानिमित्ताने त्यांनी प्रिवेडिंग शूटची संकल्पना मांडली. आधुनिक काळात सुद्धा ऐतिहासिक वारसा जपणारी ही आमची पिढी! सध्याच्या काळात देखील आम्ही विसरलो नाही. आपल्या पुर्वजांनी या मातीसाठी केलेले बलिदान, त्याचे स्मरण म्हणुन ऐतिहासिक आठवणींच्या नजराण्याची खास पेशकस.
एक आगळ्या वेगळ्या ढंगातखास तुमच्या आमच्या सर्वांच्या साठी. असे म्हणत या दोघांनी शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण करत प्रिवेडिंग शूट केले. त्यांच्या या प्रिवेडिंग शूटचा टिझर चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. अनेकांनी त्यांच्या या संकल्पनेचं मोठं कौतुक केलं आहे. शिवकालीन युद्धकलेची आवड जोपासण्यासाठी मोनिकाने दहा वर्षांपूर्वी एका शिबिरात सहभाग दर्शवला होता. ही कला शिवजयंती आणि गणेशोत्सव मिरवणुकीत मोजक्या कलाकारांकडून सादर केली जाते. त्यामुळे ही युद्धकला शिकण्याची ईच्छा तिने व्यक्त केली. मर्दानी खेळ पुरुषांपुरते मर्यादित न राहता महिलांनी देखील ती शिकावी, जेणेकरून त्या स्वतःचे रक्षण करतील या हेतूने तिने अनेक महिलांना ही कला शिकवली.
गेल्या अनेक वर्षांपासून शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या माध्यमातून ती या कलेचे प्रात्यक्षिक सादर करते. या संस्थेच्या चिंचवड येथील शाखेची ती प्रमुख आहे. आजवर अनेकांना तिने लाठी काठी, दांडपट्टा, तलवार आणि भाला यांचे मोफत प्रशिक्षण दिले आहे. मोनिकाच्या साहसी खेळाच्या सादरीकरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. आपल्या प्रिवेडिंगच्या संकल्पनेत तिने हा विचार सर्वदूर पसरवण्याचा निर्णय घेतला. अर्थात शार्दूलला देखील तिची ही संकल्पना विशेष भावली. म्हणूनच त्यांचे हे प्रिवेडिंग शूट आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.