महेश टिळेकर यांचा हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री निमिषा सजयन मुख्य भूमिकेत दिसत आहे. प्राजक्ता हनमघर, स्मिता जयकर, मोहन जोशी, वर्षा उसगावकर, गौरव मोरे, सिध्दार्थ जाधव, गार्गी फुले, सीमा घोगळे. समीर चौघुले यांसारखे बरेचसे नामवंत कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या प्रीमिअर सोहळ्याला प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीने आवर्जून हजेरी लावत महेश टिळेकर यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले. या अभिनेत्रीला अनेक जाणकार प्रेक्षकांनी लगेच ओळखले असेल. या ज्येष्ठ अभिनेत्री आहे लीला गांधी.
एकेकाळी लावणी सारख्या लोक कलेला दुय्यम दर्जाचे मानले जायचे. त्याकाळात ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी लावणीचे अनेक प्रयोग सादर करून स्वतःची वेगळी ओळख जपली. वयाच्या आठव्या वर्षी लीला गांधी यांनी नृत्याचे शास्रोक्त प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. आई गायिका असल्याने आपल्या मुलीने देखील कला क्षेत्रात यावे आणि नाव कमवावे अशी त्यांची ईच्छा होती. वयाच्या बाराव्या वर्षी लीला यांनी एका भावगीतावर लावणी नृत्य सादर केले, त्या कार्यक्रमात भगवान दादा उपस्थित होते. त्यांना लीला यांनी सादर केलेली लावणी खूप आवडली. तेव्हा रंगीला चित्रपटात एका गाण्यातील कडव्यासाठी लीला गांधी यांना झळकण्याची संधी मिळाली होती. अशा रीतीने लीला गांधी यांचा चित्रपटातला प्रवास सुरु झाला.
गाण्यात डान्स करण्याचे त्यांना सव्वाशे ते दीडशे रुपये मिळायचे, त्यातही त्यांनी समाधान मानले. गावोगावी, खेडोपाडी जाऊन त्यांनी लावणीचे कार्यक्रम सादर केले. अनेकदा नाचणाऱ्या बायका म्हणून त्यांना हिनवले जायचे. परंतु आपण जे काम करतोय त्याच्याशी प्रामाणिक राहून जिद्दीने त्यांनी आपला हा प्रवास पुढे चालत ठेवला. मराठी चित्रपटात लावणी लोकप्रिय करण्यामध्ये लीला गांधींचा मोठा वाटा आहे. लावणी या लोककलेला लोकप्रियता, लोकाश्रय मिळावा तसेच प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्या महाराष्ट्रभर फिरल्या. ‘लीला गांधी नृत्यदर्शन’ हा कार्यक्रम त्यांनी राज्यभर सादर केला. अतिशय खडतर परिस्थितीत जिथे सुविधांची वाणवा होती अशा तळागाळाच्या ठिकाणी त्यांनी लावणीचे कार्यक्रम सादर केले होते.
सांगत्ये ऐका या चित्रपटातील गाण्यांसाठी लीला गांधी यांनी नृत्य दिग्दर्शनाचे काम केले. फटाकडी, केला इशारा जाता जाता, देवा तुझी सोन्याची जेजुरी, पहिला भाऊ, बंदीवान मी या संसारी, भिंगरी, मानाचं कुंकू. मानाचा मुजरा, लक्ष्मीची पावले, शुभमंगल सावधान अशा चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. दरम्यान लीला गांधी यांचे लग्न झाले. चार अपत्ये देखील झाली. थोरल्या लेकीनंतरचा मुलगा मात्र लिव्हरच्या त्रासाने जग सोडून गेला. मी ज्याची अपेक्षा कधी केली नाही त्या लोकांनी मला जे प्रेम दिलं. मला वेगवेगळे पुरस्कार दिले त्यात मी समाधानी आहे असे त्या आवर्जून म्हणतात. हवाहवाई या चित्रपटाच्या प्रीमिअर शोला लीला गांधी आवर्जून उपस्थित राहिल्या. इतक्या वर्षानंतर त्यांना पाहून प्रेक्षकांनी आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला.