लाखात अशी देखणी या नाटकातील पद्मा चव्हाण यांच्या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राची मर्लिन मनरो व सौंदर्याचा ऍटम बॉम्ब हे किताब दिले होते. निखळ सौंदर्याचा झरा असलेल्या पद्मा चव्हाण यांनी मराठी चित्रपट तसेच नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या. सासु वरचढ जावई, गुपचूप गुपचूप, लग्नाची बेडी चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या. पद्मा चव्हाण या मूळच्या कोल्हापूरच्या. सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या. बालपणापासूनच लाडात वाढलेल्या पद्मा चव्हाण यांना मात्र शाळेतील अभ्यासाचा कंटाळा यायचा. जेमतेम प्राथमिक शिक्षणापर्यंत त्यांनी मजल मारली होती.
अभिनयाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. रंगभूमीवरून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांना भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा चित्रपटातून झळकण्याची प्रथम संधी मिळाली. इथूनच मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा पाया घट्ट रोवला. अवघाची संसार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, जोतिबाच्या नवस, लाखात अशी देखणी, गुपचूप गुपचूप, सासू वरचढ जावई, अष्टविनायक. जावयाची जात, घायाळ, पोरका अशा जवळपास २८ मराठी चित्रपटातून त्यांनी खलनायिकेच्या भूमिका आपल्या बिनधास्त अभिनयाने चांगल्याच रंगवल्या. पद्मा चव्हाण नाटकातून काम करत असताना त्या नाटकाच्या जाहिरातींमध्ये मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब अशी विशेषणं त्यांच्या नावापुढे लावली जायची.
मराठी चित्रपट सोबत त्यांनी आदमी, बिन बादल बरसात, सदमा, कश्मीर की कली अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटातून काम केले होते. पद्मा चव्हाण या चित्रपटातून जशा बिनधास्त भूमिका साकारत तशा त्या खाजगी आयुष्यात देखील तेवढ्याच बिनधास्तपणे वावरत असत. बंडखोर लेखक चंद्रकांत खोत यांच्याशी त्यांचे संबंध जुळले होते असे त्यांच्याबाबत बोलले जायचे. चंद्रकांत खोत यांनी पद्मा चव्हाण यांच्यासोबत लग्न केल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की पद्मा चव्हाण यांनी खोतांविरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला. त्यावेळी कोर्टात त्यांचा हा खटला १० ते ११ वर्षे रखडला. दरम्यान १२ सप्टेंबर १९९६ रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले.
पद्मा यांच्या निधनानंतर चंद्रकांत खोत अज्ञातवासात गेले. ते कुठे गेले होते याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. त्यावेळी ते अध्यात्मिकतेकडे वळले अशी चर्चा जोर धरताना दिसली. अनाथांचा नाथ, गण गण गणात बोते, अलख निरंजन, बाराखडी, बिनधास्त, बिंब प्रतिबिंब, विषयांतर अशा संग्रहाचे लेखन त्यांनी केले होते. बोल्ड लेखक म्हणूनही अनेक वाचकांना त्यांनी मोहिनी घातली होती. बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा परतले. कलाकार कोट्यातून सरकारकडे मागणी केली पण अखेरपर्यंत त्यांना घर मिळाले नाही. शेवटी चिंचपोकळी डिलाईल रोडवरील साईबाबांच्या मंदिरात बसू लागले. तिथे अनेक जण त्यांना साधू समजून त्यांच्या पाया पडत असत. १० डिसेंबर २०१४ साली त्यांनी याच मंदिरात अखेरचा श्वास घेतला.