आजकाल सेलिब्रिटी कलाकारां इतकीच त्यांची मुलंही लोकप्रिय होत आहेत. सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात. त्यामुळे त्यांचे स्टार किड्स चाहत्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. अशाच स्टारकिड्स मध्ये प्रसिध्द आहे ती अभिनेता स्वप्नील जोशीची मुलगी मायरा. मायरा ही नेहमी स्वप्नीलच्या इंस्टाग्राम पेजवरच्या व्हिडिओमध्ये दिसते. स्वप्नील आणि मायराचं नातं किती खास आहे हे त्याच्या फोटो आणि रिल्समधून चाहत्यांना एव्हाना चांगलेच माहित आहे. स्वप्निलला मायरा बाबी अशी हाक मारते हे पण अनेकांना कळालं आहे.
पण स्वप्नीलने नुकताच एक फोटो शेअर केला आणि मायराला एक असं सत्य सांगितलंय. स्वप्नीलचा लेकीसोबतचा फोटो आणि कॅप्शन वाचून क्षणभर चाहतेही अवाक झाले आहेत. २५ सप्टेंबर हा जागतिक कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. कन्यादिनी लाडक्या लेकीचं कौतुक करताना सेलिब्रिटी कलाकारही उत्साहात होते. सोशल मीडियावर सतत एक्टीव्ह असणारा आणि मुलगी मायरा आणि राघव यांच्यासोबतचे धमाल व्हिडिओ शेअर करणारा स्वप्नील चाहत्यांना लेकीसोबत सोशल मीडियावर भेटला. स्वप्नीलने मुलगी मायराला मांडीवर घेत एक फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत स्वप्नीलने जी कॅप्शन लिहिली आहे त्यामध्येच खरंतर त्याने मायराचा वडील म्हणून मनातील गोष्ट उघड केली आहे.
स्वप्नीलने असं लिहिलं आहे की, बाप मुलीला जन्म देत असतो. पण मायरा, मी तुला जन्म नाही दिला. त्याने पुढे असं म्हटलं आहे की, मायरा, तुझ्या जन्मामुळेच मी बाप झालोय. त्यामुळे सत्य हे आहे की तूच मला बाप म्हणून जन्म दिला आहेस. तू जन्माला आलीस म्हणूनच मी बाप झालो. वडील ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. स्वप्नील म्हणतोय की, आईवडील हे मुलांचे जन्मदाते असतात असं कितीही म्हटलं तरी मुलं हीच आईवडीलांना नवा जन्म देतात. माझ्या आयुष्यात मायरा म्हणून तूच मला बाप, वडील बनवलं आहेस. स्वप्नीलने कन्यादिनी त्याच्या मनातील हे सत्य ओठावर आणलं आहे. अर्थात याचा अर्थ समजून घेण्याचं मायरा हीचं वय आणि समज अजून नाही.
तरी स्वप्नीलला नेमकं काय म्हणायचं आहे आणि वडील म्हणून तो मायराच्या बाबतीत किती हळवा आहे हे त्याचा हा फोटो सांगून जातो. स्वप्नील सध्या तू तेव्हा तशी या मालिकेत सौरभ पटवर्धन ही भूमिका साकारत आहे. जीवलगा या मालिकेनंतर त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. तर लवकरच स्वप्नील प्रार्थना बेहरेसोबत सुटका या सिनेमातही दिसणार आहे. अतिशय लहान वयात स्वप्नीलने अभिनय करायला सुरूवात केली. त्याची कृष्णाची भूमिका खूप गाजली होती. मराठी सिनेमा, मालिका आणि वेबसिरीज गाजवणारा स्वप्नील त्याच्या कुटुंबीयांसोबतचे क्षण चाहत्यांशी शेअर करत असतो.