श्वास हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरणारा होता. या चित्रपटातील बालकलाकराच्या भूमिकेसाठी अश्विन चितळेला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या एका चित्रपटामुळे अश्विन चितळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आणि मराठी सृष्टीत नावलौकिक मिळविताना दिसला. या चित्रपटानंतर अश्विन देवराई, आहिस्ता आहिस्ता, जोर लगाके हय्या, आशायें, टॅक्सी नं ९२११ या मराठी तसेच हिंदी चित्रपटात झळकला. बालकलाकार म्हणून अश्विनने चित्रपटांमधून खूप प्रसिद्धी मिळवली. मात्र पुढे त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष्य दिले.
पुण्यातील नूतन विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर त्याने एसीपी कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. अश्विन आता टुरिस्ट गाईड म्हणून काम करतो आहे याचे प्रशिक्षण त्याने घेतले आहे. आकाशवाणी पुणेसाठी आपलं पुणे या कार्यक्रमातून अश्विनने लेखन केले आहे. ११ भागांच्या या मालिकेत डेक्कन कॉलेज, बंडगार्डन यांसारख्या ठिकाणांसोबत जमशेदजी जॉजीभाय यांच्याबद्दल अश्विनने पुण्याच्या काही खास गोष्टी सांगितल्या. पुणेकरांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळालेल्या या मालिकेचे लेखन आणि निवेदन स्वतः अश्विननेच केले होते. अश्विन गेल्या चार वर्षांपासून फारशी भाषेचे ज्ञान अवगत करतो आहे. इंडोलॉजीचा अभ्यासक म्हणून अश्विनने जेव्हा फारसी भाषा शिकायला सुरुवात केली. तेव्हा त्याने रुमीच्या कविता आणि जीवनात खोलवर डोकावायला सुरुवात केली.
रुमीच्या पौराणिक कथा त्याला आकर्षक वाटल्या. रुमीचे संपूर्ण जीवन विविध साहित्याद्वारे त्याने संकलित केले आणि त्यांचे भाषांतर केले. त्यानंतर त्याने एक इंस्टाग्राम अकाउंट सुरू केले जेथे तो फक्त रुमीच्या शायरी, कविता अपलोड करतो. यावर विविध कार्यक्रम देखील त्याने नियोजित केले आहेत. रुमीच्या कवितेवर अध्यात्मिक प्रशिक्षक शम्स तबरीझी यांच्यासोबतच्या जीवनातील अनुभवांवर कथाकथन सादर केले जाते. रुमी है हे कथाकथनाच्या प्राचीन प्रकारात सादर केले जाते. दास्तांगोई आणि नक्काली हे सादरीकरणाचे पारंपारिक इराणी प्रकार आहेत. या दोन्ही कला १३ व्या शतकात विकसित झाल्या होत्या आणि त्या शाही दरबारात सादर केल्या जात असत. या कार्यक्रमातून अश्विनने त्याच्या अभिनयात ही दोन्ही रूपे दाखण्याचा प्रयत्न केला आहे.