१० सप्टेंबर रोजी मलेशिया येथे ‘मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल पिजंट २०२२’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी विविध देशातून दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. भारत, श्रीलंका, कंबोडिया, कझाकस्तान, फिलिपीन्स, इंडोनेशिया, मलेशिया, नागालँड अशा विविध देशातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधित्व स्वीकारणाऱ्या डॉ रोहित शिंदे याने टॉप ३ मध्ये प्रवेश मिळवला. कंबोडिया, भारत, श्रीलंका आणि नागालँड या टॉप चार स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगलेली पाहायला मिळाली. कंबोडियाच्या केलवन फॉक्सने ही स्पर्धा जिंकली असून भारताच्या रोहित शिंदे याने सेकंड रनरअपचा मान पटकावला.
तर नागालँडने फर्स्ट रनर अपचा मान पटकावला. श्रीलंकेच्या स्पर्धकाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रातील डॉ रोहित शिंदे याने या स्पर्धेसाठी गेल्या तीन वर्षांपासून मेहनत घेतली होती. सेकंड रनरअप ठरल्याने त्याची ही मेहनत फळाला आली असल्याचे दिसून येते. डॉ रोहित शिंदे हा व्यवसायाने डॉक्टर आहे मात्र त्याला मॉडेलिंगची विशेष आवड आहे. या स्पर्धेअगोदर मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल २०१९ मध्ये त्याने सहभाग घेतला होता. तर काही नामवंत ब्रॅण्डसाठी त्याने रॅम्पवॉक देखील केलं आहे. ‘मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल २०२२’ या स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी रोहित काही दिवसांपूर्वीच मलेशियाला रवाना झाला होता.
रोहित शिंदे हा अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्या प्रेमात आहे. रुचिराच्या वाढदिवसाच्या दिवशी या दोघांनी सोशल मीडियावर ही बाब जाहीर केली होती. मलेशियात होणाऱ्या या स्पर्धेसाठी रुचिराने रोहितला शुभेच्छा दिल्या होत्या. या स्पर्धेवेळी रुचिरा त्याच्याच सोबत होती. रोहित या स्पर्धेचा सेकंड रनर अप ठरल्यानंतर सोशल मीडियावर रुचिराने अभिनंदन करणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून सेलिब्रिटींनी रोहितवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. रुचिरा जाधव हिने मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून रुचिराने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, फो मो, माझ्या मित्राची गर्लफ्रेंड अशा मालिका वेबसिरीज मधून ती झळकली आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमुळे रुचिरा प्रसिद्धीच्या झोतात आली. झी मराठी वाहिनीवर येऊ घातलेल्या दार उघड बये या नव्या मालिकेतून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रोहित आणि रुचिरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते त्यांच्या या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. हे दोघेही सध्या आपल्या करिअरकडे लक्ष्य देत आहेत. मॅन ऑफ द ग्लोब २०२२ स्पर्धेत डॉ रोहित शिंदे सेकंड रनर अप ठरल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन.