महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिऍलिटी शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या शोमधून प्रसिद्धीस आलेली शिवाली परब हिच्या बाबत नुकतीच एक वाईट घटना घडली आहे. शिवाली परब हिने हास्यजत्राच्या शो मधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. याच कामानिमित्त ती मिरारोड परिसरात शूटिंगसाठी जात होती. काल रविवारी देखील शूटिंग असल्याने कल्याणहून तिने ऑनलाइन रिक्षा बुक केली होती. रिक्षातून प्रवास करत असताना भिवंडी येथील पिंपळास फाटा इथे पोहोचताच मागून दुचाकीवरून दोन अज्ञात इसमानी शिवालीच्या हातात असलेला मोबाईल हिसकावला. काही प्रतिकार करायच्या आत त्या चोरट्यांनी ताबडतोब तेथून पळ काढला.
शिवालीकडे आयफोन १३ हा मोबाईल फोन होता. मोबाईल हिसकावून नेल्याची तक्रार तिने कोनगाव पोलीस ठाण्यात जाऊन नोंदवली आहे. त्या दोन अज्ञात चोरट्यां विराधात पोलिसांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास चालू आहे असे सांगण्यात येत आहे. मराठी सेलिब्रिटींच्या बाबतीत अशा घटना कित्येकदा घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तू तेव्हा तशी मालिकेतील वल्ली म्हणजेच अभिज्ञा भावे ही ठाण्यातून प्रवास करत होती. रात्री उशिरा शूटिंग आटोपून तिने घरी जाण्यासाठी रिक्षा बुक केली होती. त्यावेळी काही अंतरावर पोहोचताच बाईकवरून आलेल्या चोरटयांनी तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला होता. या प्रकरणी तिने देखील पोलिसाठण्यात तक्रार नोंदवली होती. मोबाईल चोरीला गेला याचे दुःख नसले तरी त्यात महत्वाचे डिटेल्स असल्याने तिने याबाबत काळजी व्यक्त केली होती.
ठाण्यात अशा घटना वारंवार होतात याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी तिने त्यावेळी केली होती. रात्री अपरात्री प्रवास करणे धोक्याचे असले तरी दिवसाढवळ्या देखील सेलिब्रिटींना असे अनुभव वारंवार अनुभवायला येत आहेत. हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप याला देखील काहीसा असाच एक धक्कादायक अनुभव आला होता. शूटिंगवरून घरी जात असताना रिक्षाचालकाची अरेरावी आणि लुटण्याच्या हेतून दुसऱ्याच मार्गाचा निवडलेला पर्याय त्याने उघडकीस आणला होता. त्यावेळी पृथ्वीकने सतर्क एकाहून पोलिसांना फोन लावला होता. काही मिनिटांत पोलीस त्या ठिकाणी येताच रिक्षाचालकाने तिथून पळ काढला होता. त्यामुळे अशा घटना घडतात त्यावेळी कलाकारांनीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनी देखील सतर्क राहणे गरजेचे असते.