आंध्रप्रदेश राज्यातील तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील तमाम भक्तांचे श्रद्धा स्थान आहे. देशभरातून बालाजीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असलेले वाहन प्रवेशावर बंदी आणली जाते, असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा, मूर्ती गाडीत दिसल्यास टोलनाक्यावर स्थानिक प्रशासन गाड्यांवर बंदी आणतात हे खूप चर्चेत होते. त्यावरून लोकांनी संस्थान विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. इथून पुढे बालाजीच्या दर्शनाला न जाता आम्ही गड किल्ल्यांवर जाऊ अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांकडून मिळू लागल्या होत्या.
या प्रकरणी माननीय अजित पवार यांनी देखील तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात यावेत असे मुख्यमंत्र्यांना सुचवले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आंध्रप्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून यावर खुलासा करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केलेली होती. तर भीम आर्मी देखील बालाजी संस्थानाविरोधात आक्रमक भूमिका घेऊ लागली. ज्यांच्या शौर्यामुळे पराक्रमामुळे देशातील गडकिल्ले आणि मंदिरे सुरक्षित राहिली. त्या अखंड भारताचे आराध्य दैवत असलेल्या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्त्यांना, फोटोंना मनाई करण्यात येते ही खरंच दुर्दैवाची बाब आहे. ह्या गोष्टी स्थानिक लोकांच्या आणि पोलिसांच्या संगनमताने घडत असाव्यात असा आरोप त्यांनी लावला होता.
खासदार संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी तिरुपती देवस्थानला हजेरी लावली होती. तिथे त्यांनी देवस्थानाच्या संस्थापकाशी चर्चा केली. पत्रकार परिषदेत धर्मा रेड्डी यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, ‘गेल्या १५ ते २० दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत आहे. तिरुमला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्तीला बंदी घातली जाते हे चुकीचं आहे. काही एक दोन लोकांमुळे हा चुकीचा मेसेज पसरवला जात आहे. तिरुमला देवस्थान हे हिंदूंचे मोठे देवस्थान आहे. देवस्थान हिंदू धर्माच्या प्रसारासाठी कायम पुढाकार घेत असते. मात्र हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर कुठल्याही धर्माची चिन्ह किंवा राजकीय नेत्यांचे फोटो असल्यास त्याला आम्ही प्रवेशाला सक्त मनाई करतो.
तसेच राजकीय हालचालींना येथे पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या फोटोंना देखील बंदी घातली जाते. कोणत्याही राजकीय, सामाजिक पक्षाचा झेंडा, निशाणी, चिन्ह यावर बंदी घालण्यात येते. मात्र भाविकांकडून गाडीत लावण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, गणपती, हनुमान यांच्या छोट्या मुर्त्यांवर बंदी नाही. त्यामुळे या छोट्या मुर्त्यां गाडीत असल्यास यापुढे देखील मंदिर प्रशासनाकडून कोणतीही अडवणूक होणार नाही’. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंध्र प्रदेश मधील तिरुमला तिरुपती बालाजी सिद्ध देवस्थानचे अध्यक्ष श्री वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्या सोबत भेट घेतली आहे.