अभिनेता, गायक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांचे असंख्य चाहते आहेत. किशोर कुमार झगमगत्या दुनियेत जेवढे प्रसिद्ध झाले तेवढेच त्यांचे खाजगी आयुष्य देखील चर्चेत आले. रुमा घोष यांच्यासोबत पहिले लग्न केल्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांना घटस्फोट दिला आणि मधुबाला सोबत संसार थाटला. मात्र अवघ्या काही वर्षातच मधुबालाचे निधन झाले. त्यानंतर किशोर कुमार यांनी योगिता बालीसोबत तिसरे लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षातच त्यांनी योगिता बालीला घटस्फोट दिला. दोन वर्षानंतर किशोर कुमार यांनी लीना चंदावरकर सोबत चौथा विवाह केला. दरम्यान लीना चंदावरकर यांनी बॉलिवूड सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली होती.
किशोर कुमार यांच्यासोबत लग्न करण्याअगोदर लीना चंदावरकर यांचे पहिले लग्न झाले होते. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी चुकून गोळी लागल्याने सिद्धार्थ बांदोडकर यांचा मृत्यू झाला होता. लीना चंदावरकर या मूळच्या धारवडच्या, एका सधन मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला, मुंबईतच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. सुनील दत्त यांच्या पुढाकाराने मन का मित या चित्रपटातून त्यांचे बॉलिवूड सृष्टीत पदार्पण झाले. पहिल्या लग्नानंतर वैधव्य आलेल्या लीना चंदावरकर या काही काळ नैराश्येखाली वावरत होत्या. लोकांशी भेटणे बोलणे बंद झाले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.
दरम्यान किशोर कुमार यांच्याशी जवळीक वाढली आणि त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सुमितचा जन्म झाला आणि चित्रपट सृष्टीतून त्यांनी संन्यास घेतला. मात्र अवघ्या ७ वर्षांच्या त्यांच्या सुखी संसाराला पुन्हा गालबोट लागलं. १९८७ साली किशोर कुमार यांचे हृदय विकाराने निधन झाले. किशोर कुमार यांच्या निधनानंतर लीना चंदावरकर पुन्हा एकाकी पडल्या. मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळत एकेक दिवस पुढे ढकलत राहिल्या दरम्यान मानेच्या आजारामुळे पुन्हा काम करण्याकडे दुर्लक्ष झाले. मराठी चित्रपटात काम करण्याची खूप ईच्छा आहे मात्र तशी कोणी ऑफरच दिली नाही अशी खंत त्यांनी काही वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती.
२०१५ साली मुंबईत झालेल्या हम लोग या अवॉर्ड सोहळ्यात त्या उपस्थित राहिल्या होत्या. या सोहळ्यात ज्येष्ठ वकील राम जेठमलानी हजर राहिले होते. त्यावेळी राम जेठमलानी यांनी लीना चंदावरकर यांना किस केला होता. एक प्रसिद्ध वृत्तपत्रात हा किस्सा छापून आला त्यावेळी लिनाजींनी प्रतिक्रिया दिली होती की, ‘जेव्हा मी स्टेजवर चढत होते तेव्हा मला चक्कर आल्यासारखे वाटत होते. राम जेठमलानी यांनी माझी मदत केली आणि स्टेजवर गेल्यावर किस करू का अशी विचारणा केली तेव्हा मी हो म्हटलं. ते ९२ वर्षांचे होते पण त्यांचं हृदय आजही तरुण आहे मी त्यांच्या भाषणाची चाहती आहे’.