गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. पुण्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सोसाट्याचा वारा आणि रात्रंदिवस पडत असलेला पाऊस यामुळे झाडं देखील आता उन्मळून पडू लागली आहेत. अशा वेळी ती झाडं जगवण्यासाठी अनेकजण धडपड करताना दिसतात. आपल्या मराठी सृष्टीत देखील असे कलाकार आहेत जे झाडं जगवण्याच्या त्यांचे संगोपन करण्याची तयारी दर्शवतात. मध्यंतरी सयाजी शिंदे यांनी देखील रस्त्याच्या मध्ये येणारे भले मोठे वडाचे झाड त्या जागेवरून क्रेनच्या मदतीने उचलून नेऊन दुसरीकडे लावले होते.
अशातच संतोष जुवेकर देखील आपल्या घराजवळ उन्मळून पडलेल्या एका झाडाबद्दल चिंता व्यक्त करत होता. काही वेळापूर्वीचं संतोषने घराजवळील एक झाड उन्मळून पडल्याची माहिती सोशल मीडियावर टाकली होती. हे झाड पुन्हा जगवण्यासाठी तो त्याच्या चाहत्यांकडून मदत मागत होता. ‘मित्रांनो माझ्या घराजवळ माझ्या बिल्डिंगच्या बाहेर एक झाडं कोलमडून पडलंय वाऱ्यामुळे. ते उत्तम बहरलेलं आहे. फार मोठ्ठ ही नाही आणि फार छोटंही नाही पण ते पुन्हा उभं केलं तर जगेल छान. मला कुणाला संपर्क करता येईल कारण ते एकट्याने उभं करणं शक्य नाही आणि ते उत्तम रित्या पुन्हा कस रोपण करता येईल याची माहिती मला नाही. जर कुणी मला कुणाचा संपर्क देऊ शकलात ज्यांना हे काम उत्तम करता येतंय तर प्लिज उपकार होतील.
कुणी ठाणे किंवा कळवा ह्या भागात असणारे असतील तर उत्तम होईल. झाड विदेशी प्रजातीतील विलायती चिंच आहे.’ अशी सविस्तर पोस्ट त्याने पत्त्यासहित शेअर केली होती. अवघ्या काही मिनिटांतच संतोषला त्याच्या मित्रमंडळींकडून वेगवेगळे सल्ले मिळाले. काही सुजाण नागरिकांनी त्याला मदत करू शकतील अशा व्यक्तींचे नाव सुचवले. विजू माने यांनी संतोषला वृक्ष संवर्धनाचे काम करणाऱ्या रोहित जोशीचा नंबर दिला. अवघ्या काही वेळात रोहित जोशी संतोषच्या घरी पोहोचले मात्र तिथे पोहोचताच एक वेगळेच चित्र त्यांना समोर दिसले. मात्र काही कामासाठी संतोष त्या झाडापासून बाजूला गेला तसा तो परत त्या झाडापाशी आल्यावर त्याला ते झाड कोणीतरी मुळापासून तोडून टाकलेले पाहायला मिळाले.
आपण हे झाड वाचवू शकलो नाही याची खंत व्यक्त करत संतोषने हळहळ व्यक्त करत व्हडिओ शेअर केला. आपल्या घरातील व्यक्ती जर आजारी पडली तर आपण त्याला मारून टाकतो का? नाही ना, आपण त्याची काळजी करतो. त्याला आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा त्याला उभं करतो. मग झाड सुद्धा पुन्हा उभं राहिलं असतं, त्याला जगवता आलं असतं’. रोहित जोशी म्हणाले की, विलायती चिंच हे झाड विदेशी जरी असले तरी या झाडाच्या चिंचा अनेक पक्षी खातात. ठाण्यात अनेक झाडं आहेत मात्र ह्या झाडामुळे पक्ष्यांचे पोट भरत होते. हे झाड नक्कीच वाचवता आलं असतं, मात्र आम्ही पोहोचण्या अगोदरच हे झाड मुळासकट कोणीतरी तोडून टाकलं. समोरचे चित्र पाहून आम्ही खूप हळहळलो.