राजदत्त दिग्दर्शित ‘माझं घर माझा संसार’ हा सुंदर चित्रपट अनेक रसिक प्रेक्षकांनी पाहिला असेलच. १० सप्टेंबर १९८६ साली सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला संमती देण्यात आली होती. ३ जुलै १९८७ रोजी मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रत्नाकर मतकरी यांच्या माझं काय चुकलं या नाटकावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. अजिंक्य देव, मुग्धा चिटणीस, रिमा लागू, यशवंत दत्त, राजन ताम्हाणे, आसावरी जोशी, रुही बेर्डे, जयराम कुलकर्णी, नीलिमा बोरवणकर अशी जाणकार कलाकार मंडळी या चित्रपटाला लाभली होती. नुकतेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने चित्रपटाच्या काही खास आठवणी जाग्या करूयात.
घर संसार म्हटले की सासू सुनेच्या वादाला ठिणगी पेटणार हे त्याकाळचे ठरलेले गणित. हा चित्रपट देखील अशाच कथेवर आधारित असलेला पाहायला मिळाला. चित्रपटाची नायिका म्हणजे दिवंगत अभिनेत्री मुग्धा चिटणीस हिचा हा एकमेव अभिनित केलेला मराठी चित्रपट. दृष्ट लागण्या जोगे सारे, हसणार कधी बोलणार कधी या गाण्यांमुळे मुग्धाला अमाप लोकप्रियता मिळाली आजही हे गाणं अनेकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त मुग्धा चिटणीस यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ऑल इंडिया रेडिओ मध्ये त्या कार्यक्रम सादर करत असत. मुग्धा चिटणीस उमेश घोडके यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.
दुःखाची बाब म्हणजे वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षीच १० एप्रिल १९९६ रोजी कॅन्सरच्या गंभीर आजाराने मुग्धा चिटणीस यांनी या जगाचा निरोप घेतला होता. कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा त्यांची मुलगी ईशा अवघ्या ५ वर्षाची होती. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगी ईशा आज्जी आजोबा लेखक अशोक चिटणीस आणि डॉ शुभा चिटणीस यांच्यासोबत मुंबईत राहिली. उमेश घोडके यांनी ईशाला आई आणि वडील असे दोघांचे प्रेम दिले. शिक्षणासाठी त्यांनी तिला अमेरिकेत नेले. ईशाने अमेरिकेत कायदे विभागात प्रमुख पदावर काम केलं. अमेरिकन सरकारने लॉ अँड सायन्स विभागात तिला प्रशिक्षण देऊ केले. मुग्धा चिटणीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ आजही ठाण्यात मुग्धा चिटणीस घोडके कला संस्कृती प्रतिष्ठान तर्फे कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.