अष्टविनायक हा अजरामर चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले होते तर निर्मितीची धुरा सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी निभावली होती. शरद पिळगावकर यांनी चित्रपटाच्या नायकासाठी सुरुवातीला विक्रम गोखले यांना पसंती दिली होती. मात्र त्यांच्या अवास्तव अटी पाहून त्यांनी त्यांचा नाद सोडून दिला होता. दरम्यान सचिन पिळगावकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतून नायकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे या चित्रपटात नायक म्हणून आपलाच मुलगा का नसावा याचा त्यांनी विचार केला. सचिनजींनी या चित्रपटाला होकार दिल्यावर नायिकेची शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी वंदना पंडित या दूरदर्शनवर निवेदनाचे काम करत होत्या.
सचिन यांच्या आईनेच वंदनाचे नाव नायिकेसाठी सुचवले होते मात्र यादरम्यान वंदनाजींचे लग्न ठरले होते. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाला नकार दिला होता. लग्नाअगोदरच हा चित्रपट पूर्ण होईल अशी खात्री त्यांना पिळगावकरांनी दिल्यावर त्या हा चित्रपट करायला तयार झाल्या. या दोघांचाही पदार्पणातील पहिला चित्रपट ठरला होता. अष्टविनायक चित्रपटाला अनेक सुंदर सुरेल गाणी लाभली आहेत. तू सुखकर्ता तू दुखहर्ता, प्रथम तुला वंदितो, दिसते मजला सुख चित्र नवे, आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ओठात येई गाणे, अष्टविनायका तुझा महिमा कसा अशी अजरामर गीतांची रचना शांता शेळके, शांताराम नांदगावकर, जगदिश खेबुडकर, मधुसूदन कालेलकर यांनी केली आहेत.
अनिल अरुण यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गीते अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, डॉ वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केली आहेत. आली माझ्या घरी ही दिवाळी, दाटून कंठ येतो ही चित्रपटातील गाणी रेकॉर्ड झाली होती मात्र पिळगावकर आणखी एका चांगल्या गाण्याच्या शोधात होते. जगदीश खेबुडकर हे मुंबईत आले की दादर येथील रामनिवास येथे मुक्कामास आले हे कळताच पिळगांवकरांनी मध्यरात्री घर गाठले. घराजवळ येताच खालूनच ते खेबुडकरांना हाका मारू लागले आणि खेबुडकरांना गाडीत बसण्यास सांगितले. ‘अष्टविनायकसाठी एक महत्वाचं गाणं आहे आणि ते तुम्हीच करायचं’ असे म्हटल्यावर खेबुडकर गोंधळले.
‘मला अष्टविनायकाची काहीच कल्पना नाही आणि मी एकही गणपती पाहिला नाही’ असा प्रश्न त्यांनी समोर उभा केला. तेव्हा पिळगावकर यांनी अष्टविनायकाची सर्व माहिती असलेली पुस्तिका त्यांच्या हातात दिली. हातात पेन घेऊन खेबुडकरांनी अष्टविनायकाची महती सांगणारे हे गीत पूर्ण लिहीले तोपर्यंत सकाळ झाली होती. जवळपास १८ मिनिटांचं हे गाणं प्रभादेवीच्या बॉम्बे साउंड लॅबोरेटरीमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं. चित्रपटाचे अगोदर शूटिंग करण्यात आले होते, ते रद्द करून पुन्हा या गाण्याचे चित्रीकरण केले गेले. शाहू मोडक, सूर्यकांत, उषा चव्हाण, रवींद्र महाजनी, अशोक सराफ, सुधीर दळवी, आशा काळे, जयश्री गडकर, अनुप जलोटा अशा मान्यवरांनी या गाण्यातील पाहुण्या कलाकराची भूमिका साकारली. या सुरेल संगमाने केवळ चित्रपटाची गाणीच नाही तर हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला.