एकेकाळी गुन्हेगारी जगताची सूत्रे हातात घेऊन अरुण गवळी यांनी दरारा निर्माण केला होता. सत्तरच्या दशकात भायखळा, परळ आणि सात रास्ता या मध्य मुंबई भागात कार्यरत असलेल्या रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या नेतृत्वात असलेल्या “भायखळा कंपनी” मध्ये ते दाखल झाले होत्व. १९८८ च्या सुमारास, रामा नाईक पोलिसांच्या चकमकीत ठार झाले त्यानंतर अरुण गवळी यांनी ती टोळी ताब्यात घेतली आणि दगडी चाळ या निवासस्थानापासून ती चालू केली. त्यांच्या नियंत्रणाखाली या टोळीने मध्य मुंबई भागातील गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवले होते. अरुण गवळी याची गुन्हेगारी जगतातील सुरुवात ते राजकीय क्षेत्रातील पदार्पण या सर्व घडामोडींची दगडी चाळ साक्षीदार आहे.
रमा नाईक आणि बाबू रेशीम यांच्यानंतर भायखळा कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर अरुण गवळी यांनी दगडी चाळीला बालेकिल्ला बनवला होता. अंडरवर्ल्डमधील घडामोडी, पोलिसांसोबतच्या चकमकी, अटकसत्र हे सर्व टाळण्यासाठी या चाळीचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. त्यांच्याच जीवनावर आधारित दगडी चाळ २ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तो परत येतोय असे कॅप्शन देऊन दगडी चाळ २ या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डोक्यावर गांधी टोपी, पांढराशुभ्र शर्ट पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाळा, काटक शरीरयष्टी गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव दगडी चाळीचा रॉबिनहूड.
अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’ असे म्हणत मुख्य भूमिकेत पुन्हा एकदा मकरंद देशपांडे झळकताना पाहायला मिळत आहे. मच्छिंद्र बुगडे यांनी कथालेखन केलेल्या चित्रपटाचे चंंद्रकांत कणसे यांनी २०१५ साली दिग्दर्शन केले होते. अंकुश चौधरी, पूजा सावंत, कमलेश सावंत, संजय खापरे, यतीन कार्येकर असे जाणते कलाकार या चित्रपटाला लाभलेले पाहायला मिळाले. चित्रपटात मकरंद देशपांडे यांनी भूमिका साकारली, आता दगडी चाळ २ या आगामी चित्रपटातील डॅडींच्या भूमिकेत पुन्हा एकदा मकरंद देशपांडे दिसणार आहेत. या आगामी चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. चित्रपटाचा टिझर नुकताच लॉन्च झाला असून या टिझरला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला आहे.