ज्या भूमिकेमुळे आपल्याला एक नवी ओळख मिळाली, ज्या व्यक्तिरेखेने नवी प्रेरणा मिळवून दिली आज त्याच्याच सहवासात राहण्याचे अभिनेत्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. हे स्वप्न मनाशी बाळगलं होतं अभिनेते अजय पुरकर यांनी. आज हेच स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून अजय पुरकर यांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटात अजय पुरकर यांनी वीर बाजीप्रभूंची भूमिका गाजवली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. अजय पुरकर प्रत्यक्षात ही भूमिका जगले होते. या भूमिकेसाठी त्यांनी अतिशय मेहनत घेतली होती.
त्यामुळे या व्यक्तिरेखेचा सहवास लाभावा म्हणून त्यांनी विशाळगडच्या पायथ्याशी आपल्या स्वप्नातलं टुमदार घर बांधण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यांची हीच ईच्छा आता लवकरच पूर्णत्वास आलेली पाहायला मिळत आहे. अजय यांनी विशाळगडच्या पायथ्याशी जागा खरेदी करून तिथं एक छानसं घर बांधलं आहे. घराचे काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या घराचे बांधकाम अजून पूर्ण व्हायचे आहे. विशाळगडाच्या पवित्र भूमीवर इतिहास घडला, बाजीप्रभूंनी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच पावन भूमीवर त्यांचे हे टुमदार घर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. बाहेरील बाजूने राखाडी आणि लाल रंग दिलेले हे कौलारू घर तितकेच उठावदार दिसत आहे.
चित्रपटात काम करत असताना अजय यांनी पाहिलेले घराचे स्वप्न सत्यात उतरत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. पावनखिंड चित्रपट टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविवारी १९ जून २०२२ रोजी प्रवाह पिक्चर वाहिनीवर १ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आहे. एक नवी ऊर्जा देणारा आणि शिवसंस्कार रुजवणारा चित्रपट सर्वांनी पाहावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. या भूमिकेमुळे मला छोट्या मित्रांकडून भरभरून प्रेम मिळालं, अनेकजण आवर्जून माझ्यासाठी भेटवस्तू देखील आणतात अशी अजय यांनी खास आठवण सांगितली. एक किस्सा सांगताना एका मुलाचे पालक त्यांना म्हणाले होते की, त्यांचा मुलगा रात्री झोपेतून उठून रडू लागला. आणि म्हणाला ‘बाजीप्रभू एकटेच उभे राहून रडत आहेत मला तिकडे घेऊन चला’. हे प्रेम पाहून खरंच भारावून जायला होतं.