भारंभार सिनेमे, मालिका करण्यापासून काही कलाकार लांब असतात. मोजकं पण नेटकं काम करणाऱ्या कलाकारांची नावं मराठी मनोरंजन विश्वात घेतली जातात ती याच कारणामुळे. या यादीत अभिनेत्री मुक्ता बर्वेचं नाव घेतलं जातं ते तिच्या अभ्यासू आणि चोखंदळपणामुळे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थिनी असलेल्या मुक्ताचं पहिलं प्रेम अर्थातच नाटक आहे. तरीही सिनेमा, मालिका, वेबसिरीज या माध्यमातही मुक्ताने ठसा उमटवला आहे. अभिनय क्षेत्रात यशस्वी घोडदौड सुरू असताना ५ वर्षांनी मुक्ता तिच्या आवडत्या ठिकाणी परतणार आहे. आता ती आवडती जागा कोणती आणि त्याठिकाणी मुक्ता काय करणार आहे या प्रश्नांची उत्तरं तिनं दिली आहेत.
हातात कागद, डोळ्यांवर चष्मा, अंगावर सुती साडी आणि काव्यवाचनात तल्लीन मुद्रा अशा लुकमधील तिचा फोटो सध्या चर्चेत आहे. या नव्या रूपात मुक्ता तिच्या आवडत्या रंगमंचावर चाहत्यांना अनुभवता येणार आहे. प्रिय भाई हे दोन शब्द म्हणावेत तर ते सुनीताबाईंनीच. पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी यापलीकडे एक संवेदनशील कवयित्री अशी ओळख असलेल्या सुनीता देशपांडे यांच्या भूमिकेत मुक्ता रंगमंचावर अवतरणार आहे. गेल्या ५ वर्षात मालिका, वेबसिरीज, सिनेमे यामध्येच व्यस्त असलेल्या मुक्ताला रंगमंचावर येण्यासाठी निमित्त हवं होतं. भाईंच्या सुनीताबाईंच्या रूपाने मुक्ताला तिचा आवडता मंच मिळाला आहे. मुक्ताने हि खुशखबर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मुक्तानं म्हणते की, पाच वर्षांनी पुन्हा रंगमंचावर येताना मनापासून आनंद होत आहे. गुणी आणि उत्साही टीम, उत्तम स्क्रिप्ट आणि सर्वात जिव्हाळयाचा विषय म्हणजे पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे. या ओळींसोबत मुक्ताने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तिनं पुढे म्हटलंय, लेखकाच्या आयुष्यात खराखुरा घडलेला प्रसंग, पुलं आणि सुनीताबाई यांच्याबाबत. प्रिय भाई, एक कविता हवी आहे या कार्यक्रमामध्ये सुनीताबाई साकारण्याची संधी मिळाली आहे. सध्या प्रयोगाची तालीम सुरू असून ११ जूनला पहिला तर १९ जूनला दुसरा प्रयोग होत आहे. पुलं आणि सुनीताबाई यांच्यातील गोड नात्यावर ही कलाकृती सादर होत आहे.
पण नेमका हा कार्यक्रम काय आहे, यामध्ये काय पहायला ऐकायला मिळणार हे मात्र मुक्ताने गुलदस्त्यात ठेवलं आहे. मुक्ता आणि नाटक याबाबतीत सांगायचं तर आम्हाला वेगळं व्हायचंय हे तिचं नाटक खूप गाजलं. त्यानंतर ती घडलय बिघडलय या शोमध्ये कॉमेडी करताना दिसली. पिंपळपान, आभाळमाया या मालिका गाजल्या. रूद्रम सिरीजमध्ये ती वेगळया रूपात दिसली. अजूनही बरसात आहे ही तिची मालिका काही दिवसांपूर्वीच संपली. थांग, देहभान, जोगवा, डबल सीट, मुंबई पुणे मुंबई या सिनेमात तिच्या अभिनयाची ताकद अनुभवायला मिळाली. लवकरच ती वाय या सिनेमात दिसणार आहे. पण रंगभूमीवरच्या पहिल्या प्रेमाखातर मुक्ता सुनीताबाई आणि कविता हा धागा गुंफायला सज्ज झाली आहे.