सध्या मराठी चित्रपट सृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची चलती पाहायला मिळत आहे. त्याला प्रेक्षकांकडून तसेच इतिहास प्रेमींकडून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.शिव छत्रपतींच्या शौर्याची गाथा मांडणारा असाच एक चित्रपट वर्षा अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण अक्षरांत लिहिलेली एक अजरामर शौर्यगाथासांगणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून प्रेक्षकांनी या चित्रपटाचे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे मराठी चित्रपट इतर भाषेत देखील रिलीज व्हावेत अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत होती.
त्यामुळे ‘हर हर महादेव’ हा आगामी चित्रपट मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ अशा तब्बल पाच भाषेत प्रदर्शित करणार असल्याचे जाहीर केले आहे. या चित्रपटात शरद केळकर महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे दिसून येते. नुकतेच शरद केळकरने हर हर महादेव या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे तो या चित्रपटाचा महत्वाचा भाग असणार हे निश्चित झाले आहे. शरद केळकरने बाहुबली चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी डबिंग आर्टिस्टचे काम केले होते. त्याच्या कामाचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते. या नंतर तानाजी चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला. आणि तो ही भूमिका तितक्याच ताकदीने निभावताना दिसला.
हर हर महादेव या आगामी चित्रपटासाठी त्याला छत्रपतींच्याच भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे करणार आहेत. अभिजित यांनी नटरंग, आणि डॉ काशीनाथ घाणेकर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का या चित्रपटांसाठी काम केले आहे. हर हर महादेव या ऐतिहासिक चित्रपटात अनेक नवख्या कलाकारांना देखील अभिनयाची संधी मिळणार आहे. मुख्य म्हणजे अमृता खानविलकर ही देखील या चित्रपटाचा महत्वाचा भाग असणार आहे. सोबतच सायली संजीव, मंगेश देसाई, सोनाली पाटील, हार्दिक जोशी हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट मराठी भाषे व्यतिरिक्त ईतर भाषांमध्ये प्रदर्शीत होत आहे याचा फार आनंद होत आहे. अशा प्रकारे महाराजांचा ईतिहास सर्व मराठी व्यतिरीक्त ईतर भाषिक लोकांना समजला पाहिजे.
हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शीत होत आहे तर ईतर सर्व भाषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करू नये हीच माझी विनंती आहे.