स्वकमाईतून गाडी खरेदी करणं असो वा मुंबईत स्वतःचं घर घेणं या सर्व आयुष्यात येणाऱ्या गोष्टी कलाकारांसाठी सुखावणाऱ्या असतात. तुझेच मी गीत गात आहे मालिका फेम अभिजित खांडकेकर याने देखील हा अनुभव घेतलेला पाहायला मिळतो आहे. मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून अभिजित खांडकेकर मराठी सृष्टीत कार्यरत आहे. सुरुवातीला एक रेडिओ जॉकी म्हणून त्याने काम केले होते. इथे अनेक सेलिब्रिटींची मुलाखत घेत असताना त्याला अभिनयाचे वेध लागले. पुढे सेलिब्रिटींशी ओळख झाल्याने त्याचा फायदा त्याला या क्षेत्रात करिअरसाठी झाला.
माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत त्याला मृणाल दुसानिस सोबत झळकण्याची संधी मिळाली. ही त्यांनी अभिनित केलेली पहिली मालिका ठरली होती. त्यापुढे मालिका, चित्रपट या माध्यमातून तो मुख्य भूमिकेतून सतत प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे अभिजीतला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून टीव्ही माध्यमात अधिराज्य गाजवताना दिसली होती. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत तो मल्हार कामतची भूमिका साकारत आहे. तर धर्मवीर या चित्रपटात तो कृषिमंत्री डॉ दादासाहेब भुसे यांची भूमिका निभावताना दिसला. त्यामुळे अभिजीत आता आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असलेला पाहायला मिळतो आहे. अभिजीतची पत्नी सुखदा खांडकेकर ही देखील अभिनेत्री आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून सुखदा पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तर हिंदी नाटकांमधून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे हे खांडकेकर दाम्पत्य स्थिरस्थावर असलेले पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईत घर घेऊन त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर केल्याने त्यांच्यावर सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुंबईतील या नव्या घरात अभिजित आणि सुखदाने नुकताच गृहप्रवेश केला. विधिवत पूजा करून त्यांनी या आनंदाच्या क्षणी मोजक्याच मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना आमंत्रित केले होते. गृहप्रवेशचे खास फोटो पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या नव्या घरासाठी अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांचे खूप खूप अभिनंदन.