रात्री अपरात्री शुटिंगहून घरी परतत असताना कलाकारांना अनेक चांगले वाईट अनुभव आलेले पाहायला मिळाले आहेत. रात्रीचा प्रवास करून ही कलाकार मंडळी जीव मुठीत घेऊन आपल्या घरी रवाना होत असतात. मात्र हा प्रवास करत असताना चोरांचा सुळसुळाट नाहक त्रास देणारा ठरला आहे. असाच काहीसा अनुभव अभिज्ञा भावे हिने देखील घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिज्ञा ठाण्यातील शूटिंग आटोपून घरी जाण्यास निघाली होती. या घटनेबाबत अभिज्ञाने एक सविस्तर माहिती दिली आहे. सोबतच तिने या घटनेत पोलिसांनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य घालावे अशी मागणी केली आहे. या घटनेबाबत ती म्हणते की, आजकाल मी सोशल मीडिया क्वचितच वापरते.
पण अलीकडे माझ्यासोबत घडलेली एक घटना लक्षात आणून द्यावी लागेल. कारण मला खात्री आहे की बर्याच लोकांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला असेल किंवा कदाचित ही गोष्ट तुम्हाला अशा घटनांपासून वाचवेल! तो नियमित शूटिंगचा दिवस होता, मी साडे दहा पर्यंत पॅक केले. त्यादिवशी माझ्याकडे माझी कार नसल्याने एक सामान्य मुलगी घरी परत जाण्यासाठी करते तशी मी रिक्षाने प्रवास करायचा ठरवला. ५ मिनिटांनी एक रिक्षा आली, माझी बॅग ठेवली आणि रिक्षात बसले. अवघी १० मिनिटं झाली असतील, मी ठाण्यातील विवियाना ब्रिज फ्लायओव्हर वर सव्वा अकराच्या सुमारास होते. तेव्हा बाईकवरून दोन जण समोर आले आणि माझ्या डाव्या बाजूला येऊन मोबाईल हिसकावण्यासाठी झटपट करू लागले.
मी रिक्षाच्या मधोमध बसले होते, अगदी थोडा वेळ हा संघर्ष सुरु होता. अखेर खूप प्रयत्नानंतर त्यांनी अतिशय वाईट रीतीने झटका देऊन मोबाईल हिसकावला. माझा फोन गेला त्या क्षणी हाताला जोराचा झटका बसला होता, मी सुन्न झाले होते. पुढच्याच क्षणी माझ्या मनात बाईकचा नंबर लिहायचा विचार आला पण बाईकला नंबर प्लेट नव्हती हे विशेष. रिक्षाचालकाने बाईकचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण काही वेळाने ते पसार झाले. दोन्ही मुलं विशीच्या वयातील अन चांगल्या कुटुंबातील वाटत होती, अंधार असल्याने त्यांचे चेहरे मात्र दिसत नव्हते. पोलीस स्टेशनला थांबण्याचा विचार केला, पण रात्री उशिरा असल्याने आधी घरी पोहोचणे सर्वात सुरक्षित असेल असे वाटले.