झी मराठी वाहिनीने अग्गबाई सासूबाई या मालिकेचा सिक्वल असलेली ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आणली होती. मात्र काही महिन्यातच या मालिकेला प्रेक्षकांनी नाकारलेले पाहायला मिळाले. मालिकेत एक नवखा चेहरा शुभ्राच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या शुभ्राची भूमिका साकारली होती अभिनेत्री उमा ऋषिकेश हिने. उमाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने शुभ्राची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. अग्गबाई सुनबाई या मालिके अगोदर ‘स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतून उमाने पार्वती बाईंची भूमिका गाजवली होती. एसएनडीटी महाविद्यालयातून उमाने एमएची पदवी प्राप्त केली आहे.
याशिवाय कथ्थक आणि नाट्य संगीताचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. उमा ऋषिकेश हिचे पूर्ण नाव आहे “उमा ऋषिकेश पेंढारकर”. प्रसिद्ध गायक, नाट्य दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर हे तिचे सासरे तर प्रसिद्ध नाट्यतपस्वी, गायक भालचंद्र पेंढारकर यांची ती नातसून होय. उमाचा नवरा ऋषिकेश पेंढारकर हे आर्किटेक्ट आहेत. प्रशांत दामले यांच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकात उमाने रेवतीची भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच संगीताचीही आवड असलेल्या उमासाठी हे नाटक खूपच खास ठरले होते. या भूमिकेसाठी तिला राज्यपुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. अग्गबाई सुनबाई या मालिकेनंतर उमा आता लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
येत्या ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत उमा ऋषिकेश महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत शिव पार्वतीच्या भूमिकेत संदीप गायकवाड आणि सिद्धी पाटणे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. चिन्मय उदगीरकर प्रथमच या मालिकेच्या निर्मिती टीममध्ये दिसणार आहे. त्यामुळे उमा ऋषिकेशसाठी ही अध्यात्मिक मालिका तितकीच खास ठरणार आहे. मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. येत्या काही दिवसात या मालिकेतील बालकलाकाराबाबत लवकरच उलगडा होईल. तूर्तास या नव्या मालिकेनिमित्त उमा ऋषिकेश हिला शुभेच्छा!