गेल्या काही दिवसांपासून मराठी सृष्टीत लग्नसोहळ्यांना उधाण आले आहे. ३ मे रोजी अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांचा लग्नसोहळा पार पडला. तर सोनाली कुलकर्णी हिने लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लंडन येथे कुणाल बेनोडेकर सोबत पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातलेला पाहायला मिळाला. गेल्या वर्षी सोनालीने अगदी साध्या पद्धतीने विवाह केला होता त्यामुळे तिची लग्नातली हौसमौज अपुरी राहिली होती. यानिमित्ताने मोठ्या थाटात तिने पुन्हा एकदा लग्न केले. तर हैद्राबाद कस्टडी या आगामी चित्रपटाची नायिका म्हणजेच पीएसआय पल्लवी जाधव या नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून पल्लवी जाधव यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली होती.
नुकतेच त्यांच्या लग्नातील मेहेंदीचा सोहळा आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडलेला पाहायला मिळाला. रविवारी १५ मे २०२२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील सुर्या लॉन्स येथे पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला असून लग्नाचे काही खास फोटो पल्लवी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या या आनंदाच्या बातमीवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही वर्षांपासून पल्लवी जाधव यांना लग्नासाठी स्थळं येत होती. मात्र पोलीस अधिकारी असल्यामुळे समोरून त्यांना नकार मिळायचा असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. त्यानंतर आता कुलदीप यांच्या रूपाने आयुष्यातला खरा जोडीदार मिळाला आहे आणि त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
पल्लवी जाधव यांनी अतिशय खडतर प्रवास करत पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी सौंदर्य स्पर्धा गाजवून हैद्राबाद कस्टडी या चित्रपटातून मराठी सृष्टीत पदार्पण केले आहे. पल्लवी जाधव या मूळच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावच्या. लहानपणापासून आपण हिरोईन व्हायचं, टिव्हीमध्ये झळकायचं हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. मात्र जसजसे कळू लागले की आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे तसतसे हे स्वप्न स्वप्नच राहणार याची जाणीव पदोपदी होत गेली. पुढे लग्नाच्या चिंतेने आई वडिलांनी पुढील शिक्षणासाठी नकार दिला. मात्र यातूनही मार्ग काढून शिक्षण न थांबवता मेहनत घेत राहण्याचा निर्णय पक्का केला.
आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवी यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. आई वडिलांनी बचतगटातून ५ हजारांचे कर्ज काढून दिले. कमवा आणि शिका या योजनेतून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील यश मिळवलं. पल्लवी जाधव जालना जिल्ह्यातील महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाच्या दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जयपूरमध्ये झालेल्या ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी फर्स्ट रनर अप हा किताब जिंकला. अधिकारी बनण्याचे स्वप्न तर त्यांचे पूर्ण झालेच तर आता लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या चित्रपटातून अभिनेत्री बनून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत.