रविवारी ८ मे रोजी स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या शोमध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले होते. तर सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांनी परिक्षकाची भूमिका निभावली. महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून या स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या पहिल्या पर्वात राजयोग धुरी, सिद्धांत मोदी, राधिका पवार, सायली टाक, शुद्धी कदम, सार्थक शिंदे या सहा जणांनी फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला. महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांची चांगलीच चुरस पाहायला मिळाली.
मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम. शुद्धीच्या सुरेल आवाजाची जादू या शोमध्ये प्रेक्षकांनी अनुभवली होती. त्यामुळे तीच या पर्वाची विजेती ठरणार असे प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच वाटत होते. आनंद शिंदे यांच्या हस्ते शुद्धी कदमला विजेती म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शुद्धीला ४ लाखांचा धनादेश आणि सोबतच वामन हरी पेठे यांच्याकडून स्पेशल गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. विजेत्या स्पर्धकांचे नाव जाहीर करताच सिद्धी भावुक झालेली पाहायला मिळाली. आनंदाच्या भरात तिच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. सार्थक शिंदे हा स्पर्धक या शोचा उपविजेता ठरला.
तर सायली टाक हिने या शोमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. सायलीला १ लाख रुपयांचा धनादेश तर उल्लेखनीय कामगिरीबद्दल राधिका पवार आणि सिद्धांत मोदी यांना सन्मान चिन्हासोबतच ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. सिद्धांत या चिमुरड्याने आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली होती. सचिन पिळगांवकर यांनी अशी ही बनवाबनवी मध्ये सुधाची भूमिका साकारली होती. तसाच गेटअप सिद्धांतने केल्यामुळे सचिन खूपच भावुक झाले होते. पहिल्या पर्वाचे अनेक मंत्रमुग्ध करणारे क्षण प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. महाअंतिम सोहळ्यात या सर्व आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. शुद्धी कदमने विजेतेपदाचा मान पटकावला यासाठी तिचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!