आज ८ मे रोजी मातृदिनाच्या शुभेच्छा देत मराठी सेलिब्रिटींनी आपल्या आई सोबत तसेच मुलांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निवेदिता सराफ यांनी देखील प्रथमच आपल्या आई सोबतचा एक जुना फोटो शेअर करून चाहत्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर दे धमाल सारख्या शो मधून मराठी सृष्टीत बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारी प्रिया बापट हिने देखील मातृदिनाचे औचित्य साधून आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. दे धमाल, आभाळमाया, दामिनी, बंदिनी अशा मालिका तसेच मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई अशा बॉलिवूड चित्रपट सृष्टीतही प्रियाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
या प्रवासात तिला आई,वडील आणि बहिणीची मोलाची साथ मिळत गेली. मात्र आता आईच्या जाण्याने तिची कमतरता कायमच जाणवणार अशा शब्दात तिने आपल्या वडिलांना उद्देशून एक भावनिक गोष्ट शेअर केली आहे. मुख्य म्हणजे मातृदिनाच्या दिवशीच प्रियाच्या बाबांचा वाढदिवस आहे. त्यामुळे हा क्षण तिच्यासाठी खूप हळवा करणारा ठरला आहे. प्रिया म्हणते की, प्रिय आई बाबा, वडील म्हणून मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच आणि कायम असाल. पण तुमच्या आणि आईच्या ३८ वर्षांच्या संसारात तुम्ही सर्वांत बेस्ट होतात. आर्थिक बाजू तर तुम्ही सांभाळलीच पण सांसारिक सर्व जबाबदाऱ्यांमध्ये तुमच्या व आईच्या पार्टनरशिपला तोड नाही.
मुलांचे लाडही दोघांनीही केले आणि आोरडाही दोघांनीही दिला. शाबासकी, कौतुक दोघांनी केलं. अगदी आई घरी नसताना स्वयंपाकाही केलात आणि कधीही अवलंबून न राहण्याची शिकवण दिलीत. आर्थिक अडचण आोढवल्यावर मॅट्रीकही न झालेली आईने घराबाहेर पडून तुमच्या बरोबरीने काम करून आर्थिक जबाबदारी पार पाडली. एरवी नाजूक तब्बेतीची आई तुम्हाला जरा बरं नाहीसं झालं तर सगळं बळ एकवटून झाशीची राणी व्हायची. आणि आईसाठी तुम्ही जे गेली ३ वर्ष केलत, तिची सेवा प्रेम ते क्वचितच कोणी नवरा आपल्या बायकोसाठी करत असेल.
इतकं निस्वार्थ प्रेम तुम्हा दोघाची मुलं म्हणून श्वेता आणि मी जन्माला आलो. तुमच्या सारख्या आई वडिलांची सेवा करता येणं हेच आमच्या जन्माचं सार्थक आहे. आईची कमतरता कायमच जाणवेल. आज तुमच्या वाढदिवशी Mother’s Day आहे म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच. आईकडे आता जादूची कांडी आहे तुमच्याकडे आशिर्वाद आहेत. दोन्ही आमच्या पाठीशी असू देत, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो. या सुंदर आणि तितक्याच भावपूर्ण मेसेजने नेटकऱ्यांनी प्रियाच्या वडिलांना वाढदिवसाच्या आणि मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.