खरंतर एखादी मालिका सुरू असते तेव्हा त्यातील नायक आणि नायिकेच्या जोडीची, त्यांच्यातील केमिस्ट्रीची जोरदार चर्चा सुरू असते. पण मालिका संपल्यानंतरही चर्चेत राहणाऱ्या जोड्या हटकेच म्हणाव्या लागतील. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा आणि पाठकबाई यांची जोडी गाजली ती त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे. साध्याभोळ्या राणावर शिकलेल्या अंजली पाठक बाई फिदा झाल्या आणि त्यातून फुललेल्या त्यांच्या प्रेमाची रांगडी गोष्ट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ऑनस्क्रीन रंगलेली ही जोडी आता प्रत्यक्ष आयुष्यातही तुझ्यात जीव रंगला म्हणत लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. नुकताच राणा गायकवाड म्हणजेच हार्दिक जोशी आणि अंजली पाठक फेम अक्षय देवधर यांचा साखरपुडा झाला.
कोणताही गाजावाजा न करता थेट दोघांनी त्यांच्या साखरपु्ड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांची जोडी बघून चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाकारांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्यापासून ते ऋता दुर्गुळे, शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी, अमृता पवार यांच्यापर्यंत लग्नाचा सीझन रंगला आहे. सोनाली कुलकर्णीही ७ मे ला पुन्हा लग्न करणार आहे. यामध्येच आता अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने दोघांचेही चाहते खूपच खुश आहेत. तुझ्यात जीव रंगला ही मालिका अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची मुख्य भूमिकेतील पहिलीच मालिका होती. या मालिकेने ही जोडी घराघरात पोहोचली, जवळपास तीन वर्षे ही मालिका सुरू होती.
या मालिकेत त्यांची केमिस्ट्री पाहून नेहमीच चाहते त्यांनी लग्न करावं अशी इच्छा व्यक्त करायचे. मात्र या मालिकेच्या दरम्यान अक्षया आणि अभिनेता सुयश टिळक यांच्यातील रिलेशनशीप वाढली. पण या दोघांचा गेल्या वर्षी ब्रेकअप झाला. त्यानंतर मालिकेत साध्या लुकमध्ये असणारी पाठकबाई म्हणजेच अक्षया सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत चर्चेत आली. त्यानंतर अनेकदा हार्दिक आणि अक्षया यांनी एकत्र फोटोही शेअर केले. मात्र त्यांनी त्यांच्या नात्यातील खास गोष्ट जाहिर केली नव्हती. साखरपुड्याचे फोटो शेअर करत दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला. अक्षयाने नुकतेच हे तर कायच नाय या शोचे निवेदन केले होते. तर हार्दिक सध्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिध्दार्थ देशमुख ही भूमिका साकारत आहे.