२०११ साली शाळा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन बारा वर्षे लोटली आहेत. केतकी माटेगावकर, अंशुमन जोशी, केतन पवार, जितेंद्र जोशी, दिलीप प्रभावळकर, देविका दफतरदार हे कलाकार या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटामुळे केतन पवारला देखील अमाप प्रसिद्धी मिळाली होती. त्याने या चित्रपटात मुकुंदच्या मित्राची भूमिका गाजवली होती. या चित्रपटानंतर केतन पवार प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसला. शाळा या चित्रपटामुळे केतनला एक वेगळी ओळख मिळाली. चित्रपटातील त्याने निभावलेली सूर्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
या चित्रपटानंतर पोपट, कट्टी बट्टी, खोपा, रिंगण या सारख्या सिनेमात त्याला झळकण्याची नामी संधी मिळाली. त्याच्या सहाय्यक भूमिका नेहमीच उल्लेखनीय ठरल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २६ एप्रिल २०२२ रोजी केतन पवार आणि प्राची यांच्या लग्नाचा बार उडाला आहे. मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या समवेत त्यांनी ही लग्नगाठ बांधली आहे. लग्नसोहळ्याचे खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरून त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. उत्कृष्ट अभिनयासोबतच केतन उत्कृष्ट तबला वादक देखील आहे. बालपणापासूनच संगीताची आवड असलेल्या केतनने तबला वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे.
अभिनय क्षेत्रापासून थोडा दूर जाऊन तो आता वेगवेगळ्या मंचावरून तबलावादक म्हणून कला सादर करताना दिसत आहे. ‘बहू असोत सुंदर संपन्न’ हे गाणं काही कलाकारांनी एकत्र येऊन नव्या रुपात सादरीकरण केलं होतं त्यात केतन पवारने देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. सुखन, आम्ही दुनियेचे राजे या कार्यक्रमाचे तो सादरीकरण करत आहे. सुखन कार्यक्रमाचा तो गेल्या काही वर्षांपासून अविभाज्य भाग बनला आहे. मुळशी पॅटर्न फेम ओम भूतकर हा कलाकार देखील या कार्यक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अभिनय तसेच तबलावादक अशा दोन्ही क्षेत्रात त्याचे नाव गाजले आहे. आता नुकताच विवाहबद्ध झालेल्या केतन पवारला त्याच्या आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!