अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही बाहेरगावातून मुंबईत येणे. वेळप्रसंगी उपाशी राहून दिवस काढत स्वतःच्या हिमतीवर कलाक्षेत्रात टिकून राहणे. याची मराठी सृष्टीत अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. असेच धाडस संतोष जुवेकर याने देखील केलेले पाहायला मिळाले. आजोबांच्याच प्रोत्साहनाने संतोष अभिनय क्षेत्रात दाखल झाला. आणि मकरंद राज्याध्यक्ष या नाटकातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याच्या कामाबद्दल पेपर मध्ये भरभरून लिहिण्यात आलं होतं. विक्रम गोखले यांनी देखील संतोषच्या अभिनयाचे कौतुक केले होते. संतोषने अभिनय क्षेत्रात काम करणे त्याच्या बाबांना मुळीच पसंत नव्हते त्यामुळे ते कधीच संतोषला खर्चासाठी पैसे देत नव्हते.
मात्र आईचा पाठिंबा असल्याने त्या त्याला जमेल तसे गुपचूप पैसे पुरवायच्या. या गोजीरवाण्या घरात मालिकेतून तो छोट्या पडद्यावर प्रसिद्धीस आला. कालांतराने आपला मुलगा नाव कामावतोय, आजूबाजूची लोकं आपल्याला त्याच्यामुळे ओळखतात हे त्यांच्या वडिलांसाठी कौतुकाची बाब ठरली होती. यानंतर संतोषला चित्रपटात झळकण्याची संधी मिळत गेली. २००६ साली ब्लाइंड गेम चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर चमकला. छोट्या छोट्या भूमिकेपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केलेल्या संतोषसाठी झेंडा, मोरया, एक तारा हे चित्रपट खूप महत्वाचे ठरले. या चित्रपटातून तो नायकाच्या तसेच सहाय्यक भूमिका साकारताना दिसला.
धरावी बँक या आगामी चित्रपटातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजही मी स्ट्रगलच करतोय असं तो आवर्जून म्हणताना दिसतो. सुदैवाने या क्षेत्रात आल्यावर स्थिरस्थावर व्हायला चांगली माणसं त्याला भेटत गेली असेही तो म्हणतो. उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच संतोष एक दिलदार माणूस म्हणूनही या सृष्टीत चांगलाच परिचयाचा आहे. कोणाच्याही मदतीला धावून जाणारा असा हा संतोष मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. इतक्या दिवसांचा त्याचा हा अनुभव तो आता एका नव्या माध्यमातून उलगडताना दिसणार आहे. नुकतेच संतोषने नवख्या कलाकारांसाठी अभिनय प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे.
e-Drishyam Entertainment & Film school या नावाने त्याने ठाण्यात इन्स्टिट्यूट उभारलं आहे. तुमच्या अश्याच शुभेच्छा कायम पाठीशी असू देत असे म्हणत संतोषने ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे. आपल्या करकीर्दीतला अनुभव घेऊन तो नवख्या कलाकारांना घडवण्याचे काम या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करताना दिसणार आहे. होतकरू मराठी तरुणांना योग्य प्रशिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. या नव्या क्षेत्रात संतोषला निश्चित असे यश मिळावे हीच सदिच्छा.