द कश्मीर फाईल्स चित्रपटाने प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच जगभरातील ४००० हुन अधिक स्क्रिनिंगवर ताबा घेतला हे या चित्रपटाचे खरे यश म्हणावे लागेल. अवघ्या ८ दिवसांच्या कालावधीत द कश्मीर फाईल्स चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटींच्या वर मजल मारलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील मराठमोळ्या कलाकाराने साकारलेल्या भूमिकेची सर्वच स्तरातून वाहवा होत आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने आजवर मराठी चित्रपट सृष्टीत लेखक, अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. द कश्मीर फाईल्स या चित्रपटात चिन्मयने कट्टर टेररिस्ट फारूक अहमद दार उर्फ बिट्टा कराटेची भूमिका निभावली आहे.
या भूमिकेमुळे चिन्मयला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. बिट्टा कराटे हा जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा आतंकवादी म्हणून कार्यरत होता. कालांतराने तो अलगाववादी नेता बनून चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसला. अर्थात ही कट्टर भूमिका चिन्मय मांडलेकरने त्याच्या अभिनयातून चपखलपणे प्रेक्षकांच्या समोर मांडल्या मुळेच आज तो हिंदी चित्रपट सृष्टीर खलनायक म्हणून लोकांच्या रोषाला सामोरे जाताना दिसतो आहे. चित्रपटातील भूमिकेमुळे चिन्मय मांडलेकर आता प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. सगळीकडून त्याच्या भूमिकेचे कौतुक केले जात असतानाच एका हिंदी वृत्त वाहिनीने त्याच्याशी पावनखिंड मधील भूमिकेच्या संदर्भात संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
यात त्याला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले मात्र एका प्रश्नावर चिन्मयने दिलेले उत्तर पाहून त्याचे अधिकच कौतुक केले जात असल्याचे दिसून येत आहे. चिन्मयने मराठी चित्रपटातून शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे त्याच बाजूला तो विरोधी भूमिकेत देखील तेवढाच तगडा वाटला. या दोन्ही भूमिकेबाबत चिन्मयला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी प्रदिप भंडारी असे नाव असलेल्या वार्ताहराला आठवण करून देत चिन्मयने ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या पूर्ण नावाची जाणीव करून दिली. त्यावेळी वार्ताहराला देखील आपली चूक समजताच त्याने याबाबत माफी मागितली आणि मी पूर्णपणे आदर करतो असे म्हणत आपले संभाषण चालू ठेवले.
चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव तितक्याच आदराने आणि सन्मानाने घेण्यात यावे याची जाणीव करून दिली. चिन्मयचे या प्रसंगावधानाचे सोशल मीडियावर सर्व स्तरातील प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. अगदी पावनखिंड चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी काही गोष्टी ऑप्शनल कधीच नसतात असे रोखठोक मत मांडले आहे. मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. त्यात चिन्मयच्या उत्तराने प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली आहेत.या भूमिकेचे श्रेय तो चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना देतो. मला त्यांनी या भूमिकेसाठी निवडलं त्यामुळे त्याचे संपूर्ण श्रेय त्यांचे आहे असे तो आवर्जून सांगताना दिसतो.