सध्या झोंबिवली या सिनेमामुळे अभिनेता ललित प्रभाकर प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पडदयावर आलेल्या झेांबिवली सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळतोय. असे वेगळे प्रयोग मराठी सिनेमात व्हायला पाहिजेत, असे म्हणत ललितने त्याच्यातील लेखकाचे मत व्यक्त केले आहे. आजपर्यंत मोजकं पण हटके काम केलेल्या ललित प्रभाकरला सिनेमा, मालिकांसाठी रग्गड पैसे मिळत असले तरी, एका सिनेमागृहाच्या प्रोजेक्टर चालकाने ललितच्या हातावर ठेवलेले दोनशे रूपये ललितने कधीच खर्च न करण्याचा निर्णय घेतला आहे. असं काय आहे त्या दोनशे रूपयांचे महत्त्व ज्यामुळे ललितच्या पाकिटात ते कायम राहणार आहेत.
भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जीवनप्रवास पडद्यावर दाखवणाऱ्या आनंदी गोपाळ या सिनेमात ललितने गोपाळराव यांची भूमिका साकारली होती.जेव्हा आनंदीगोपाळ हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा एका चित्रपटगृहात आम्हा सर्व कलाकारांना सिनेमा पाहण्यासाठी आणि प्रेक्षकांची मतं जाणून घेण्यासाठी जायचं होतं. गर्दीतून वाट काढत एक पन्नाशीची व्यक्ती ललितजवळ आली आणि त्यांनी खिशातून दोनशे एक रूपये काढून ललितला गोपाळरावांच्या भूमिकेवर खूश होऊन बक्षीस म्हणून दिले. ती व्यक्ती त्या चित्रपटगृहात गेल्या अनेक वर्षापासून प्रोजेक्टर चालक म्हणून काम करणारा कर्मचारी होता. पैसे नको म्हणत ललितने शुभेच्छा स्वीकारल्या. पण ते ललितला म्हणाले गेले कित्येक वर्ष मी प्रोजेक्टररूममधून सिनेमा पडद्यावर सोडण्याचे काम करतो आहे.
पण आजवर एखाद्या व्यक्तीरेखेत इतका खोलवर घुसलेला अभिनेता मी पाहिला नाही. मला तू साकारलेले गोपाळराव खूप आवडले, हे बक्षीस त्या गोपाळरावांसाठी आहे. ललितला त्या दोनशे रूपयांची खरी किंमत कळाली आणि त्याने ते बक्षीस घेतले. अप्रतिम भूमिकेसाठी चित्रपटगृहातील प्रोजेक्टर चालकाकडून बक्षीस म्हणून मिळालेले दोनशे एक रुपये, ही पडद्यावरच्या गोपाळरावांना मिळालेली खास भेट आहे. आनंदी गोपाळ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट नायकाच्या पुरस्कारापेक्षा ते दोनशे रूपये लाख मोलाचे आहेत असं सांगत ललितने हे पैसे जपायचे ठरवले आहे. ललित प्रभाकर हा मूळचा धुळ्याचा, कल्याणमध्ये त्याचे बालपण गेले. लहानपणापासून मुलाला अभिनयाची आवड आहे हे ओळखून त्याच्या शिक्षक असलेल्या आईबाबांनी त्याला पाठबळ दिले.
मिती कल्याण नाट्य संस्थेत अभिनेता म्हणून ललित घडला. कविता, नाट्य दिग्दर्शन यामध्ये रस असलेल्या ललितला भटकायला खूप आवडतं. सोशल मीडियावर चॅटिंग करण्यापेक्षा त्याला माणसांना भेटायला आवडतं. जिवलगा या मालिकेतून त्याचे टीव्हीवर पदार्पण केलं पण जुळून येती रेशीमगाठी या मालिकेने त्याला खरी ओळख दिली. तसेच आभास हा, दिल दोस्ती दुनियादारी, कुंकू या मालिकेतील त्याच्या भूमिका गाजल्या. टॉकीज हाऊस या शोचे अँकरिंगही त्याने केले. चि व चि सौ का सिनेमातून तो पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकला. स्माईल प्लीज, टीटीएमएम, हम्पी हे हटके सिनेमेही ललितची खासियत आहे.