रविवारी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हेमांगी कवी, अभिजित केळकर, बेला शेंडे, नंदेश उमप यांसारख्या अनेक कलाकारांनी शिवाजी पार्कबाहेर गर्दी केली होती. मात्र सरकारच्या प्रोटोकॉलमुळे शिवाजी पार्क मैदानाबाहेर उपस्थित राहूनही बहुतेक मराठी कलाकारांना लता दिदींचे अंतिम दर्शन घेण्याची संधी मिळाली नाही. ही खंत हेमांगी कवीने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारचे प्रोटोकॉल माहीत असल्याने बहुतेक कलाकारांनी लता दिदींच्या आठवणींना उजाळा देत सोशल मिडियावरूनच त्यांना श्रद्धांजली वाहिलेली पाहायला मिळाली.
ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लता दिदींना श्रद्धांजली वाहून त्यांची एक खास आठवण शेअर केली आहे. अजून खरंच वाटत नाही. म्हणजे त्यांना जे रोज भेटायचे त्यांना खरं वाटेलच. पण आपल्याला कसं खरं वाटेल कारण आपल्याला तर त्या फक्त गाण्यातून भेटत होत्या आणि भेटत रहाणारच आहेत. आपल्याला आणि आपल्या नंतरच्यांना जगाच्या अंता पर्यंत. आपल्यासाठी त्या म्हणजे त्यांचा आवाज आणि तो अजरामर आहे. मला नाही पटत त्या गेल्या त्या आहेत जगाच्या अंता पर्यंत. अशी एक भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली. चाहत्याच्या एका कमेंटवर त्यांनी लता दिदींच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला.
त्यात गिरीश ओक यांनी एक किस्सा शेअर केलेला पाहायला मिळाला. लता दिदींना भेटण्याचा नाही पण प्रत्यक्षात बघण्याचा योग आला होता. गोव्यात चतुरंग रंगसंमेलनात झाकिरजींचे तबला वादन होते, त्याच्या समोर सर्व मंगेशकर कुटुंबीय होते. वादनानंतर दीदी आत गेल्या आणि त्यांनी स्वतःच्या बोटातली हिऱ्याची अंगठी झाकिरजींना दिली. त्यावेळी झाकिरजींच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहू लागले. हा प्रसंग लांबून का होईना बघता आला याचे समाधान गिरीश ओक यांनी व्यक्त केले. लता मंगेशकर यांना सोन्याची फारशी हौस नव्हती. मात्र हिरे आणि पाचु त्यांना अतिशय आवडत असत. वयाच्या १३ व्या वर्षीच लता दीदींनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती.
१९४२ साली पहिली मंगळागौर ह्या मराठी चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे गीत गायलं होतं. त्यानंतरचा त्यांचा कलासृष्टीतला प्रवास चढताच राहिला. १९४८ साली त्यांनी स्वकमाईतून ७०० रुपयांची पहिली हिऱ्याची अंगठी बनवून घेतली होती. अशा लता दिदींच्या अनेक आठवणी आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यातलीच ही एक खास आठवण गिरीश ओक यांनी प्रत्यक्षात अनुभवली होती.