कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १४ फेब्रुवारी पासून रात्री ७.३० वाजता अग्रगण्य क्रिएशन्सची पहिली कलाकृती असलेली लेक माझी दुर्गा ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता सुशील इनामदार यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लेक माझी दर्गा ही नवी मालिका शक्ती या हिंदी मालिकेवर आधारित असल्याचे बोलले जाते. स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणारी दुर्गा बाबांना आपलेसे करणार का? असा विचार करणारी ही दुर्गा मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही चिमुकली दुर्गा ज्या बालकलाकाराने साकारली आहे तिच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
मालिकेतली ही चिमुरडी आहे निधी मयूर रासने. निधी या नव्या मालिकेतून दुर्गाच्या मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहे. निधीची ही अभिनित केलेली दुसरी मराठी मालिका आहे. याअगोदर सोनी मराठी वाहिनीवरील ज्ञानेश्वर माऊली या अध्यात्मिक मालिकेतून तिने बालपणीच्या मुक्ताईची भूमिका साकारली होती. मालिकेने काही महिन्यांपूर्वीच लीप घेतला आहे परंतु निधीने साकारलेली निरागस मुक्ताई तिच्या अभिनयाने सुरेख साकारलेली पाहायला मिळाली होती. मालिकेत तिच्या भूमिकेचे कौतुक देखील झाले होते. निधी रासने ही मुंबई येथे वास्तव्यास आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली या शाळेत ती शिक्षण घेत आहे. शाळेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात निधीने उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. यातूनच तिला ज्ञानेश्वर माऊली मालिकेत महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
या भूमिकेचे कौतुक झाल्यानंतर निधी आता मध्यवर्ती भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत काम करत असताना दिवसभराच्या शूटिंगच्या व्यस्त शेड्युल मधूनही वेळ काढून ती आपला अभ्यास पूर्ण करायची. त्यामुळे अभिनयासोबतच निधी अभ्यासात देखील हुशार आहे. तिच्या याच गुणांसाठी शाळेने तिचे कौतुक करणारी पाठीवर एक थाप देखील दिली आहे. निधीचे वडील गौरव रासने यांनी कोण होईल मराठी करोडपती या रिऍलिटी शोमध्ये सहभाग दर्शविला होता. आई वडिलांच्या प्रेरणेनेच निधीच्या सुप्त गुणांची पारख करून त्यांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिले आहे. लेक माझी दुर्गा या मालिकेसाठी निधी रासने हिचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.