झोंबिवली हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. झॉम्बीवर आधारित पहिल्यांदाच मराठीतून चित्रपट बनवण्यात आला आहे. हा एक हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास एक आठवडा झाला आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत ७ कोटींचा पल्ला गाठला आहे. अर्थात चित्रपटाची धुरा अमेय वाघ, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगलीच पेललेली पाहायला मिळते. आज १ फेब्रुवारी रोजी झोंबिवली चित्रपटाची नायिका वैदेही परशुरामी हिचा वाढदिवस आहे.
आपल्या निखळ सौंदर्याने आणि निरागस हास्याने तरुणांना घायाळ करणाऱ्या वैदेही परशुरामी बद्दल या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. वैदेही परशुरामी ही तिच्या केवळ दिसण्यातच नाही तर अभिनयात देखील एक खणखणीत नाणं वाजवं तशीच आहे. महेश कोठारे यांच्या वेड लावी जीवा या चित्रपटातून वैदेहीने मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. वैदेहीचे आई, वडील, भाऊ सगळेच वकील आहेत. त्यामुळे वैदेहीने इंग्रजी विषयातून बीएची पदवी मिळवली, यासोबतच वकिलीचे शिक्षणही घेतले. वयाच्या ७ व्या वर्षांपासूनच वैदेहीने आशा जोगळेकर यांच्याकडे कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. कथ्थकमध्ये मास्टरची डिग्री मिळवलेल्या वैदेहीला अभिनय क्षेत्राची ओढ लागली ती ओघानेच. ज्या नृत्यालयात ती नृत्याचे धडे गिरवत होती तिथेच उर्मिला कोठारे नृत्य शिकायला येत असे.
आदिनाथ कोठारे सोबत उर्मिलाचे लग्न जुळत होते. त्यावेळी एका कार्यक्रमात उर्मिलाचे नृत्य पाहायला कोठारे फॅमिली तिथे आली होती. तेव्हा वेड लावी जीवा या चित्रपटासाठी वैदेहीच्या आईला विचारण्यात आलं. त्यावेळी वैदेहीच्या आईने त्यांना स्पष्ट नकार कळवळा होता. वैदेही त्यावेळी १७ वर्षांची होती त्यामुळे तिने देखील कुठले क्षेत्र निवडावे याचा विचार केलेला नव्हता. शेवटी वाडीलांच्या पाठिंब्यामुळे वैदेहीने चित्रपट साकारण्याची तयारी दर्शवली. अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना वेड लावी जीवा या चित्रपटातून आदिनाथ कोठारेची नायिका बनून ती प्रेक्षकांसमोर दाखल झाली. वृंदावन, कोकणस्थ, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, एफ यु फन अनलिमिटेड अशा चित्रपटातून तिच्या अभिनयाची वाहवा झाली.
वजीर, सिंबा अशा हिंदी चित्रपटात ती तगड्या भूमिकेत पाहायला मिळाली. वजीरमधली तिची छोटीशी भूमिका असली तरी तिने ती आपल्या सहजसुंदर अभिनयाने अधोरेखित केली होती. येत्या ४ फेब्रुवारी रोजी लोच्या झाला रे या चित्रपटातून ती आणखी एका महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे एकापाठोपाठ आलेले हे चित्रपट वैदेहीसाठी खूप खास ठरणार आहेत. एखाद्या नायिकेने किती गोड दिसावं आणि किती गोड हसावं हे वैदेहीकडे पाहून भावना व्यक्त केल्या जातात. आज तिचा वाढदिवस आहे यानिमित्ताने वैदेही परशुरामीला खूप खूप शुभेच्छा!