येत्या ३१ जानेवारी २०२२ पासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ११ वाजता पिंकीचा विजय असो ही नवी मालिका प्रक्षेपित होत आहे. विजय आंदळकर आणि शरयू सोनवणे हे कलाकार या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर अधोक्षज कऱ्हाडे, हर्षद नायबळ, दिवेश मेदगे, अंकिता जोशी, सारिका साळुंखे, पियुष रानडे, अमिता खोपकर असे बरेचसे जाणते कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मालिकेतली पिंकीची मध्यवर्ती भूमिका अभिनेत्री शरयू सोनवणे साकारणार आहे. शरयू सोनवणे हीचे बालपण मुंबईतच गेले. भवन्स कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या शरयुने सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला होता. २०१५ साली आटली बाटली फुटली या चित्रपटातुन तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. नंतर २०१९ साली सूर सपाटा या चित्रपटात ती झळकली होती. कोठारे व्हिजन प्रस्तुत प्रेम पॉईजन पंगा या झी युवावरील मालिकेत शरयुला मुख्य नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे शरयुला प्रसिद्धी मिळाली होती. आता स्टार प्रवाहवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतून ती अतरंगी सतरंगी गुलजार नार, पिंकीची भूमिका साकारणार आहे. पिंकीचा विजय असो ही मालिका देखील कोठारे व्हिजन प्रस्तुत आहे त्यामुळे महेश कोठारे यांनी या नव्या मालिकेसाठी शरयूची पुन्हा एकदा मुख्य नायिका म्हणून निवड केली आहे.
सूर नवा ध्यास नवा हा रिऍलिटी शो गाजवणारा हर्षद नायबळ हा बालकलाकार पिंकीच्या लहान भावाची म्हणजेच दिप्याची भूमिका साकारणार आहे. सारिका साळुंखे ही पिंकीच्या बहिणीची म्हणजेच निरीची भूमिका साकारणार आहे. हे तिघे बहीण भावंड मालिकेतून धमाल मस्ती करताना दिसणार आहेत. मालिकेचा नायक युवराज धोंडे पाटील या अतरंगी पिंकीच्या प्रेमाच्या जाळ्यात कसा अडकतो याची उत्सुकता मालिकेच्या प्रोमोमधूनच निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. या मालिकेला बरेचसे जाणते कलाकार लाभले आहेत. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ज्येष्ठ अभिनेत्री अमिता खोपकर पिंकीचा विजय असो या मराठी मालिकेतुन मराठी सृष्टीत पुनरागमन करताना दिसणार आहेत.
तारा फ्रॉम सातारा, ये रिश्ता क्या केहलाता है या हिंदी मालिकेतून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. हिंदी मालिका सृष्टीत आजीच्या भूमिका गाजवल्यानंतर आता तट पुन्हा मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ये रिश्ता क्या केहलाता है या हिंदी मालिकेच्या एक्झिट नंतर अमिता खोपकर पुन्हा एकदा मराठी मालिकेकडे वळलेल्या आहेत. अतरंगी सतरंगी पिंकीची भूमिका शरयू सोनवणे आपल्या अभिनयाने चांगलीच गाजवणार यात शंका नाही. कारण याअगोदरही तिच्या वाट्याला अशाच स्वरूपाच्या भूमिका आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. या नव्या मालिकेसाठी आणि तितक्याच तगड्या भूमिकेसाठी शरयू सोनवणे हिचे अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा.