कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच लेक माझी दुर्गा ही नवी मालिका दाखल होत आहे. मालिकेचा पहिला प्रोमो कलर्स मराठी वाहिनीवर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अग्रगण्य क्रिएशन्सची प्रस्तुती असलेली ही पहिली वहिली मालिका असणार आहे. प्रसिद्ध निर्माते चंद्रकांत लोहकरे आणि अभिनेत्री मृणाल देशपांडे यांची ही निर्मिती संस्था आहे. या संस्थेची पहिली कलाकृती म्हणून त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केले आहे. लेक माझी दुर्गा या नव्या मालिकेत हेमांगी कवी आणि सुशील इनामदार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आईच्या प्रेमापेक्षा बापाच्या डोळ्यातली आग तिला सलतेय. दुर्गा स्वताच्या अस्तित्वासाठी का बरं संघर्ष करतेय?
असे म्हणत ही चिमुकली दुर्गा जन्मजात विकृतीमुळे आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसणार आहे. खरं तर या मालिके अगोदर दुर्गाची कहाणी हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यामुळे लेक माझी दुर्गा ही नवी मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते. कलर्स या हिंदी वाहिनीवर शक्ती अस्तित्व एक एहसास की ही मालिका प्रसारित केली जात होती. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. याच मालिकेचा आधार घेऊन आता मराठी मालिका बनवली जात आहे. मालिकेतल्या दुर्गाला समाज स्वीकारेल की नाही हा संघर्षाचा प्रवास तिचा घरातूनच सुरू झालेला पाहायला मिळतो.
आपले बाबा आपल्या लेकीसाठी खूप काही करत असतात. मात्र माझे बाबा माझ्यासाठी काहीच का करत नाही अशी खंत ही दुर्गा व्यक्त करताना दिसते. जन्मजात विकृतीमुळे आपल्या आईने आपल्याला स्वीकारले असले तरी, बाबा मात्र तिला स्वीकारत नाहीत. अशी खंत ती व्यक्त करत आहे. मालिकेच्या प्रोमोमधून कथानक कसे असेल याचा अंदाज बांधण्यात येतो. त्यामुळे आणखी एका हिंदी मालिकेचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसते. यागोदरही मराठी मालिकेचे रिमेक हिंदी वाहिनीने बनवले आहेत. तर हिंदी मालिकांचे रिमेक मराठीत बनवले जात असल्याने सध्या रिमेकचा सिलसिला चाललेला पाहायला मिळतो आहे.
अर्थात हेमांगी कवी आणि सुशील इनामदार हे आई वडिलांची भूमिका चोख बजावणार यात शंका नाही. त्यामुळे या मालिकेची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे. पुढे जाऊन मालिकेत दुर्गाचे पात्र कोणती अभिनेत्री निभावेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष्य लागून राहिले आहे. तूर्तास नव्या मालिकेनिमित्त अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता सुशील इनामदार यांचे अभिनंदन. अनोख्या कहानी आणि मालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.
ही सिरियल. थोडीशी जाऊ नको दुर बाबा ह्या सिरियल ची रिमेक. वाटत आहे