सोनी मराठी वाहिनीवर तुमची मुलगी काय करते? ही नवी मालिका प्रक्षेपित केली जात आहे. या मालिकेत मधुरा वेलणकर साटम, विद्या करंजीकर, गौरी कुलकर्णी, सतीश पुळेकर, हरीश दुधाडे असे अनेक दिग्गज कलाकार झळकताना दिसत आहेत. मालिकेत सावनी मीरजकर हे पात्र साकारले आहे अभिनेत्री जुई भागवत हिने. जुई ही मराठी मालिका आणि नाटक क्षेत्रातील हरहुन्नर अभिनेत्री आहे. उत्कृष्ट नृत्यासोबतच गायनाची देखील तिला आवड आहे. झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये तिने पार्टीसिपेट केले होते. अथर्व कर्वे या शोचा विजेता ठरला होता, तर जुईला भावपूर्ण अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते.
जुईने झी मराठीवरील मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. माझिया प्रियाला प्रीत कळेना या लोकप्रिय मालिकेत जुई बाल भूमिकेत पाहायला मिळाली होती. अभिनयाची, नृत्याची आणि गायनाची गोडी तिच्या आई आणि वडीलांमुळेच तिच्या बालमनावरच रुजली होती. जुईची आई म्हणजेच मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका, सूत्रसंचालिका दीप्ती बर्वे भागवत होय. संघर्ष यात्रा, मोगरा फुलला, स्वराज्य सौदामिनी ताराराणी, मेरे साई, स्वामिनी, पिंजरा, उंच माझा झोका अशा अनेक चित्रपट आणि मालिकेमधून दीप्ती भागवत महत्वाच्या भूमिकेत झळकल्या आहेत. याशिवाय अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन देखील केलं आहे. त्यांची आई अपर्णा बर्वे या शाळेत शिक्षिका आणि वडील जयंत बर्वे हे उत्कृष्ट हार्मोनियम वादन करायचे.
वडिलांच्या प्रेरणेनेच कलाक्षेत्रात काहीतरी करण्याची ईच्छा बालपणीच मनात रुजली होती. मकरंद भागवत यांच्याशी दीप्ती भागवत यांचे लग्न झाले. मकरंद भागवत हे संगीतकार आणि गायक आहेत. तू माझा सांगाती या गाजलेल्या मालिकेतील गीतं मकरंद भागवत यांनी संगीतबद्ध केली तसेच काही गीतं त्यांनी गायली देखील. झी मराठीवरील अस्मिता या मालिकेचे म्युझिक डायरेक्टर म्हणून त्यांनी जाबाबदरी पार पाडली आहे. मकरंद भागवत यांच्या आई जयश्री भागवत या हिंदी मराठी गीतांच्या गीतकार म्हणून ओळखल्या जायच्या. त्यामुळे दीप्ती भागवत यांचे संपूर्ण कुटुंबच कलाक्षेत्राशी निगडित आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी जुई भागवत ही देखील अभिनय क्षेत्रात स्वताची ओळख निर्माण करताना दिसत आहे.