रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ हा मराठी चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट हिट तर ठरलाच पण या चित्रपटातील गाणी देखील सुपरहिट ठरली होती. ‘ही पोली साजूक तुपातली’ या चित्रपटातील गाण्यात शिबानी दांडेकर झळकली होती. शिबानी दांडेकर ही मॉडेल, सिंगर, अँकर म्हणून लोकप्रियता मिळवताना दिसते. ही पोली साजूक तुपातली हे तिच्यावर चित्रित झालेलं गाणं देखील तुफान हिट ठरलं होतं. या चित्रपटाबरोबरच शिबानी त्याच वर्षी ‘संघर्ष ‘ या आणखी एका मराठी चित्रपटातून आयटम सॉंग साकारताना दिसली होती.
शिबानी दांडेकर ही मराठी कुटुंबात जन्मली परंतु तिचे बालपण मात्र ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत गेले. न्यूयॉर्कमध्ये काही काळ स्थिरस्थावर होताना तिने परदेशात टीव्ही माध्यमातून अँकरिंग केलं. त्यानंतर झलक दीखला जा या शोमध्ये तिने सहभाग दर्शवला होता. इंडियन प्रीमिअर लीग, आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप सारख्या खेळांचे तिने अँकरिंग केले होते. मधल्या काळात तिला दोन गाजलेल्या मराठी चित्रपटात आयटम सॉंग करण्याची संधी मिळाली. या गाण्यांमुळे शिबानी दांडेकर हे नाव महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर आले आणि मराठी मुलगी म्हणून लोकप्रियता मिळवून गेले. आता लवकरच शिबानी दांडेकर लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शिबानी दांडेकर बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. मार्च २०२२ मध्ये हे दोघेही लग्न करणार असल्याचे समोर आले आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नानंतर आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची चर्चा होती मात्र हे दोघेही सध्या तरी लग्न करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु त्याअगोदर आता शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळते आहे. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचे शाही थाटात लग्न पार पडणार असल्याचे सांगितले जाते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेले आऊटफिट हे दोघेही त्यांच्या लग्नात परिधान करणार आहेत. सद्य परिस्थितीमुळे शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या लग्नाला काही मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी आमंत्रण देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे बॉलिवूडचे हे ग्रँड वेडिंग कसे असणार याची उत्सुकता तमाम चाहत्यांना तसेच मीडियाला देखील लागून राहिली आहे.