मराठी चित्रपट तसेच मालिका अभिनेत्री आरती वडगबाळकर हिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ‘२०२१ हे वर्ष माझ्या आयुष्यात खूप कठीण गेलं, पण तू माझ्या आयुष्यात येऊन मला आईपण दिलंस! यापेक्षा आणखी काय चांगलं असू शकतं.’ असे म्हणत गेल्या वर्षाला निरोप देत आरती वडगबाळकर हिने मुलगा झाल्याची बातमी आपल्या चाहत्यांना कळवली आहे. तिच्या ह्या बातमीवर सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आरती वडगबाळकर हिने माझे पती सौभाग्यवती, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम केले होते.
याशिवाय आटपाडी नाईट्स, टाईमपास, टाईमपास २, डबल सीट आम्ही दोघी या गाजलेल्या चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बहुतेक मालिकेतून आणि चित्रपटातून आरतीने विनोदी भूमिका बजावलेल्या पाहायला मिळाल्या. माझे पती सौभाग्यवती या मालिकेत ती थोडीशी गंभीर भूमिकेत दिसली होती. नुकत्याच झालेल्या सोनी मराठीवरील सिंगिंग सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये आरतीने गाणी गाऊन प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या शो च्या माध्यमातून आरतीने गाणे गाण्याची हौस पूर्ण करून घेतली होती. अर्थात हे सेलिब्रिटी पर्व असल्याने या शोमध्ये अनेक कलाकारांनी सहभाग दर्शवला होता. स्वानंदी टिकेकर हिने या शोचे विजेतेपद पटकावले होते. बैल मेलाय या नाटकात आरतीने मुख्य भूमिका बजावली होती. अभिनया सोबतच आरतीचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड आहे.
‘कलरछाप ‘ या नावाने तिचा कपड्यांचा ब्रँड सेलिब्रिटी विश्वात खूपच प्रसिद्ध आहे. स्पृहा जोशी, सायली संजीव, राधा पाटील (मिलिंद आणि राणी गुणाजी यांची सून), प्रसाद ओक, अमेय वाघ, ललित प्रभाकर, सुव्रत जोशी, सखी गोखले हे सेलिब्रिटी तिच्या कपड्यांच्या ब्रॅण्डच्या जाहिरातींमधून झळकताना दिसतात. पूजा ठोंबरे आणि कुणाल अहिरराव यांच्या एंगेजमेंटमध्ये या दोघांनी कलरछाप ब्रॅण्डचे कपडे परिधान केले होते. आशुतोष परांडकर याच्याशी आरतीने विवाह केला आहे. आशुतोष परांडकर हे स्टोरी रायटर, स्क्रीनप्ले रायटर आणि डायलॉग रायटर आहेत. जय मल्हार, रात्रीस खेळ चाले, माझे पती सौभाग्यवती, श्री लक्ष्मी नारायण अशा मालिकेसाठी त्याने काम केले आहे. आरती आणि आशुतोष यांना पुत्ररत्न प्राप्तीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा.