मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी काल शुक्रवारी १७ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबद्ध झाला आहे. अभिषेक गुणाजी त्याची खास मैत्रीण राधा पाटील हिच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल गाव येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात विवाहबद्ध झाला आहे. हे ठिकाण निवडण्यामागचं काही खास खरं आहे. मिलिंद गुणाजी हे निसर्गप्रेमी आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आपल्या मुलाचे लग्न निसर्गाच्या सानिध्यात व्हावे अशी त्यांची ईच्छा होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल गावच्या मंदिरात अगदी पारंपरिक आणि तितक्याच साध्या पद्धतीने त्यांनी आपल्या मुलाचे लग्न लावण्याचे ठरवले.
अभिषेक आणि राधाच्या लग्नाला त्यांनी मोजक्याच मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना बोलावले होते. यात सुबोध भावेची पत्नी मंजिरी भावे आणि त्यांची दोन्ही मुलं या लग्नाला उपस्थित राहिले होते. मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी हे दोघेही अभिनय क्षेत्रातील कलाकार म्हणून ओळखले जातात तर अभिषेक गुणाजी हा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. छल या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले होते तर काही जाहिरातींसाठी त्याने दिग्दर्शन केले आहे. अभिषेक आणि त्याची पत्नी राधा पाटील हे दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. राधा पाटील ही मालवण तालुक्यातील कट्टा या गावातील डॉ आनंद पाटील आणि रश्मी पाटील यांची कन्या आहे.

राधा पाटील मुंबईत वास्तव्यास असून फार्मसी क्षेत्रात ती कार्यरत आहे. दोन आठवड्यापूर्वी अभिषेक गुणाजी आणि राधा पाटील यांची एंगेजमेंट झाली होती त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन दिवसांपासून त्या दोघांच्याही घरी लगीनघाई पाहायला मिळाली होती. १६ तारखेला संगीत सोहळा पार पडला त्यावेळी मंजिरी भावे हिने गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. तर १७ तारखेला लग्नाच्या दिवशीच त्यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला होता. लक्ष्मीनारायण मंदिरात अगदी साध्या पद्धतीने अभिषेक आणि राधाने आपले लग्न केले आहे. लग्नाला जास्त लोकांना आमंत्रित करता आले नाही त्यामुळे मुंबईत परतल्यावर खास रिसेप्शन अरेंज केले जाईल असे म्हटले आहे. अभिषेक गुणाजी आणि राधा पाटील या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
