झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओम स्वीटूच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देत आहेत. येत्या रविवारी १९ डिसेंबर रोजी मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रसारित केला जात आहे. त्यात ओम आणि स्वीटू विवाहबंधनात अडकताना दिसणार आहेत. अर्थात मागच्या वेळी लग्नात आलेल्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. मात्र आता ह्या लग्नात कोणतंच विघ्न नको यायला अशी अपेक्षा प्रेक्षकांनी केली आहे. पण जेलमध्ये आपली शिक्षा भोगत असलेली मालविका ओम आणि स्वीटूच्या लग्नात येणार आहे त्यामुळे तिच्याबद्दल अजूनही प्रेक्षकांच्या मनात थोडीशी शंका आहे.

मालिकेत ओम स्वीटूला प्रपोज करत आहे त्यामुळे त्यांचे ताबडतोब लग्न लावले जात आहे. मालिकेत ओम स्वीटूच्या लग्नाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच पार पडले आहे. रत्नागिरीतील जयगड येथील कचरे या गावातील विनायकाच्या मंदिरात शूटिंग झाले. जयगड हे गाव सध्या जिंदाल या औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. २००३ साली कचरे या गावात जिंदाल ग्रुपने विनायकाचे मंदिर बांधले आहे. हे मंदिर रत्नागिरी बस स्थानकापासून अंदाजे ३७ किलोमीटर अंतरावर आहे तर गणपतीपुळे हे ठिकाण १३ किलोमीटर अंतरावर आहे. जवळच ६ किलोमीटरवर जयगडचा किल्ला आहे. त्यामुळे पर्यटक विनायकाच्या मंदिराला देखील आवर्जून भेट देताना दिसतात. मंदिरातील गणेशाची सुबक पितळेची मूर्ती पर्यटकांना मोहित करते. मंदिरात प्रवेश करण्याअगोदर मूषकराजांचे दर्शन होते.

तसेच हनुमानाची ब्राँझचे पॉलिश करण्यात आलेली ६ फूट उंच मूर्ती या मंदिर परिसरात पाहायला मिळते. मंदिराचा आसपासचा परिसर बगीच्याने सजला आहे. माशांनी भरलेला एक तलाव येथे पाहायला मिळतो. त्यामुळे जयगड जवळील ह्या ठिकाणाला पर्यटक आवर्जून भेट देताना दिसतात. या मंदिराचा मोह आता मालिकेला देखील झालेला पाहायला मिळतो आहे. कारण याच मंदिरात ओम स्वीटू यांच्या लग्नाच्या सोहळ्याचे शूटिंग पूर्ण करण्यात आले होते. तर मालिकेचे काही चित्रीकरण जवळच्याच परिसरात करण्यात आले आहे. स्वीटू काही दिवसांपासून कोकणातील गावी स्थायिक झाली आहे. त्यात कोकणचा निसर्गरम्य परिसर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. नुकतेच ओम आणि स्वीटूच्या घरचे मंडळी देखील कोकणात दाखल झाले आहेत, ते सर्व जण स्वीटूला प्रपोज करण्यासाठी ओमला पाठिंबा देत आहेत.
