अग्गबाई अरेच्चा! या चित्रपटातून खलनायिकेच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री तेजस्वनी पंडित पुढे जाऊन मराठी सृष्टीतील मुख्य नायिका बनली. तिची आई ज्योती चांदेकर पंडित या देखील अभिनेत्री आहेत. सिंधुताई सपकाळ या चित्रपटात दोघी मायलेकींनी मुख्य भूमिका साकारलेली पाहायला मिळाली होती. तेजस्विनीचे वडील रणजित पंडित यांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आज त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तेजस्विनीने तिच्या वडिलांनी खास आठवण सांगितली आहे.
एक भावनिक पोस्ट लिहून बाबांच्या गोड आठवणीत ती रमलेली पाहायला मिळते. खास म्हणजे तेजस्विनीने एक भावनिक पोस्ट लिहून दोन चमचे असलेले फोटो शेअर केले आहेत. या चमच्याबद्दल तिच्या खास आठवणी सांगताना ती म्हणते.. ‘मला अनेकांनी विचारलं तुझं प्राईज्ड पझेशन काय आहे…..?! घड्याळ, अंगठ्या, कपडे, पर्स, सॉफ्ट टॉइज की आणखी काही. काय असं आहे जे तू कधीच कुणाला देणार नाहीस किंवा ते हरवलं तर तुझा एखादा भाग नाहीसा झाला असं तुला वाटेल…! तर ह्या त्या दोन गोष्टी आहेत. माझं माझ्या बाबांवरचं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. बाबा ने मला माणूस म्हणून घडवलं. बाबाने मला संस्कारासोबत आणखी काय दिलं तर एक चांगला कुक होण्याचा वारसा बाबा देऊन गेला, ठेऊन गेला. हे २ चमचे आमच्याकडे माझा जन्म झाला तेंव्हापासून आहेत. आम्ही मोठ्या होत असताना बाबा केटरिंग स्टुडंट आणि कामाला चहा कंपनी मध्ये होता म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला चहा करायला शिकवला. आमच्याकडे चहा वेगळ्या पद्धतीने बनतो आणि तो परफेक्ट लागतो असं मला वाटतं.
त्या चहा पावडर च्या मापाचा हा एक चमचा. आणि दुसरा तो साखरेचा चमचा. त्याची दांडी तुटली आहे. पण आजतागायत तो चमचा कधी रिप्लेस झाला नाही. कारण स्वयंपाकातील “प्रमाण” ह्याचं आमच्या घरी जाम महत्व. हे चमचे फक्त माझ्या बाबाची आठवण नसून आमच्या संस्कारातल्या, शिकवणीचं प्रमाण आहे. ज्यावर माझं “प्रमाणाबाहेर” प्रेम आहे. तोलून मापून चहा करता येईल पण बाबावरचं माझं प्रेम मोजता येणं निव्वळ अशक्य ! आज त्याच्या वाढदिवसा निमित्त लिहावसं वाटलं कारण बाबा चे खूप फोटोज नाहियेत आमच्याकडे. कॅमेराचं महत्व मला कळायच्या आधीच त्याने एक्झिट घेतली. आजही तुला तितकंच मिस करतो आम्ही बाबा ! जिथे कुठे असशील, देव बरे करो.. हॅप्पी बिर्थडे बाबा!!