लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सुपरस्टार होण्यामागे अपार मेहनत आणि जिद्दीची सांगड होती; जी खूप कमी जणांना माहित आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई रजनी बेर्डे यांनी आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ केला. कितीही दुःख असले तरी ते चेहऱ्यावर कधीच दाखवायच्या नाही, कायम हसरा चेहरा ठेवून लोकांना आनंदित कसं ठेवायचं हा त्यांचा स्वभावगुण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपलासा केला. आज बेर्डे बंधूंचा मराठी सृष्टीत येण्यासाठी स्ट्रगल नेमका कसा होता ते जाणून घेऊयात..
लक्ष्मीकांत यांना नवनवीन कपड्यांची खूप हौस होती, चांगले कपडे घालायला मिळावे आणि घरखर्चाला हातभात लागावा म्हणून त्यांनी दिवाळीत फटाके उटणं विकले. दारोदारी फिरून अगरबत्ती विकल्या, अगदी लॉटरीची तिकिटं देखील विकली मात्र दहा वर्षांनी त्याच तिकिटावर आपलं चित्र छापून येईल हे त्यांना कधीच वाटलं नव्हतं. सुरुवातीचा काळ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी हलकीचा गेला. स्ट्रगल करताना कामासाठी वणवण फिरणे चालू झाले मात्र दिवस मावळतीला आला तरी कुठेच काम हाती येत नसे, हि रोजचीच निराशा आली त्यांना आणखी उमेद दाखवू लागली. लक्ष्मीकांत यांचे चुलत बंधू प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक “पुरुषोत्तम बेर्डे” हे बहुतेकांना परिचयाचे असावे. लक्ष्मीकांत आणि पुरुषोत्तम हे दोघे बंधू मिळून कोकणस्थ समाजात नाटक बसवायचे. या दोघांनी मिळून “भाऊ बेर्डे” नावाने एक संस्था उभी केली होती. यातून सुरुवातीला एकांकिका, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केल्या. पुढे पुरुषोत्तम बेर्डे जे जे स्कुल ऑफ आर्टस् मध्ये गेले तिथून एकांकिका करत राहिले तर लक्ष्मीकांत बेर्डे साहित्यसंघात नोकरी करून नाटक करत होते. संगीतनाटक, तमाशा अशा मिळेल त्या संधीतून लक्ष्मीकांत काम करत होते परंतु म्हणावे तसे यश त्यांना मिळत नव्हते.
स्ट्रगल चालू असताना पुढे बेर्डे बंधूनी “टूरटूर” हे व्यावसायिक नाटक करायचं ठरवलं. पुरुषोत्तम बेर्डे यांनी विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीला डोळ्यासमोर ठेवून हे नाटक लिहीलं. जेव्हा नाटकाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो, तेव्हा नाटक खऱ्या अर्थाने चालले असे म्हणता येईल. मात्र नाटकाच्या सुरुवातीच्या ४०व्या प्रयोगानंतरही प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यावर लक्ष्मीकांत यांना वाटलं की “बहुतेक मला आणखीन दहा बारा वर्षे स्ट्रगल करावा लागतोय”. आता पर्यंतच्या खडतर प्रवासाच्या अनुभवातून पुरुषोत्तम बेर्डे यांना एक भन्नाट कल्पना सुचली, नाटकाची जाहिरात वेगळ्या पद्धतीने करायचे त्यांनी ठरवले. या यशस्वी कल्पनेने प्रेक्षकांना नाटकाच्या प्रयोगाला खेचून आणता आलं, या नाटकाचे ५०० प्रयोग यशस्वीपणे पार पडले. टूरटूर नाटकाच्या यशामुळे कॅमेरामन अरविंद लाड यांनी ‘हसली तर फसली’ चित्रपटात अभिनयाची मोठी संधी दिली मात्र काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण झाला नाही. टूरटूरच्या यशानंतर “शांतेचं कार्ट” हे नाटक प्रेक्षकांसमोर आलं, हे देखील प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. या दोहोंच्या अपार यशामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव महाराष्ट्रात दूरवर पोहोचलं.
पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे “हमाल दे धमाल” साहजिकच लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रमुख नायकाची भूमिका मिळाली. पुरुषोत्तम बेर्डे हे मराठीतले एक यशस्वी चित्रकार, लेखक, एकांकिकाकार, नाट्यलेखक, नाट्यदिग्दर्शक, संगीतकार, अभिनेता, प्रकाश योजनाकार, वेशभूषाकार आणि सिनेदिग्दर्शक देखील आहेत. घायल, शेम टू शेम, हाच सूनबाईचा भाऊ, भस्म, निशाणी डावा अंगठा, जाऊबाई जोरात अशा अनेक चित्रपट नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. यातील बऱ्याच चित्रपटात त्यांनी अभिनय देखील साकारला. जाऊबाई जोरात, लक्षातला लक्ष्या, खंडोबाचं लगीन, अलवार डाकू, चिरीमिरी, शिवरायांची सून ताराराणी, श्यामची मम्मी, हाच सुनबाईचा भाऊ या नाटकांसाठी त्यांना विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्करांनी गौरविण्यात आले आहे.