मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून हॅशटॅग ‘नो बिंदी नो बिजनेस’ हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवताना दिसला. लेखिका आणि ब्लॉगर “शेफाली वैद्य” यांनी जाहिरातीमधील मॉडेल्सच्या कपाळावर टिकली नसेल त्या ब्रॅंडकडून किंवा उत्पादकांकडून कुठलीही वस्तू खरेदी करणार नाही असे ठाम मत सांगणारे एक ट्विट केले होते. शेफाली वैद्य यांचे म्हणणे अनेकांना पटले तर काहींनी विरोध देखील केलेला पाहायला मिळाला.
हिंदू सणानिमित्त केलेल्या जाहिरातींमधील मॉडेल्स मयताला गेल्यासारख्या भुंड्या कपाळाच्या का दिसतात? हा एकच प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला होता त्यावरून सोशल मीडियावर याबाबत आवाज उठवण्यात येऊ लागला केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर ह्या ट्रेंड संपूर्ण भारतभर चांगलाच व्हायरल होत गेला. ह्याचा प्रभाव हळूहळू जाहिरात क्षेत्रावर पडू लागल्याने अनेक उत्पादकांनी आपल्या जाहिरातीतील मॉडेल्सच्या कपाळावर टिकली लावण्यावर भर दिला. तुम्ही हिंदू सणाला गृहीत धरून जाहिरात करता त्यांच्या कडून खरेदीची अपेक्षा करता मग त्यातल्या मॉडेल्स देखील तशाच दाखवल्या जाव्यात असा अट्टाहास त्यांनी केला. हा ट्रेंड त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नाही तर हिंदू संस्कृती टिकून राहावी म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्वांना शेफाली वैद्य यांचे म्हणणे पटले आणि त्यांनी देखील नो बिंदी नो बिजनेस हा ट्रेंड उचलून धरला.
एकीकडे हा ट्रेंड जोर धरत असताना शेफाली वैद्य यांचे म्हणणे मात्र अनेकांना रुचले नाही बहुतेकांनी त्यांच्यावर टीका उठवलेली पाहायला मिळाली तर काहींनी त्यांचे स्वतःचे टिकली न लावलेले फोटो देखील प्रसिद्ध केले. एकाने शेफाली नावाचा अर्थ गुगलवर सर्च केला त्यात त्यांचं नाव मुस्लिम धर्मीय असल्याचं सांगितलं त्यावर ‘तुम्ही शेफाली हे नाव चेंज करणार का? तुमचं नाव मुस्लिम धर्मात येतं’ असं म्हटलं होतं. ट्रोल करणाऱ्या व्यक्तीची दखल घेऊन शेफाली वैद्य यांनी सडेतोड उत्तर देत म्हटलं की, ‘ए अर्धवट, शेफाली हे अस्सल संस्कृत नाव आहे, पारिजातकाच्या फुलाचं’. शेफाली वैद्य यांनी त्यांच्या नावाच्या या स्पष्टीकरणावर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत शिवाय त्या ट्रोल करणाऱ्या व्यक्तीलाही अनेकांनी धारेवर धरलेलं पाहायला मिळत आहे.