खरंतर आपण समाजाला देणं लागतो आणि याच परोपकाराच्या सामाजिक भावनेतून अनेक संस्था लोकसहभागातून वृक्षारोपणाच्या मोहिमा हाती घेत आल्या आहेत. मात्र, बऱ्याच लोकांच्या बाबतीत ही भावना कामाच्या व्यस्ततेमुळे फक्त जागतिक दिनीच साजरी होते. तसे न करता सह्याद्री देवराई संस्थेने आजवर झाडांच्या संवर्धनाचे काम नियमीतपणे करण्याचा वसाच घेतला आहे. यासाठी सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदें अर्थदान, श्रमदान, वृक्षदान आणि बीजदानाच्या स्वरुपात जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन करीत असतात.
आपणही वृक्षारोपण सारखे सामाजिक कार्य करावे या उद्दात हेतूने महाराष्ट्राची हास्य जत्राची संपूर्ण टीम खारीचा वाटा उचलण्यासाठी बोरिवली येथील देवराई प्रकल्पात सहभागी झाली. महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या या संपूर्ण कुटुंबाने नॅशनल पार्क येथील सह्याद्री देवराई संस्थेच्या सहयोगाने वृक्ष लागवड करून अनोखी हरित दिवाळी साजरी केली आणि लागवड केलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी देखील स्वीकारली आहे. या प्रसंगी श्रमदानासाठी प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे, अरुण कदम, श्याम राजपूत, नम्रता संभेराव, प्रभाकर मोरे, रसिका वेंगुर्लेकर, निमिष कुलकर्णी,निखिल बने, दत्तू मोरे, शिवाली परब, ओंकार राऊत आणि समीर चौगुले यांनी हजेरी लावली. अभिनेते व निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मीळ प्रजातींच्या वृक्ष आणि वेलींच्या संवर्धन व संगोपनाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून नजीकच्या वृक्ष प्रेमींनी अशा मोहिमांमध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन केले आहे.
वृक्ष संगोपनाची चळवळ अधिकाधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने हा प्रकल्प महाराष्ट्रभर राबवला जात आहे. गावागावातून होतकरू तरुण मंडळी यामध्ये सहभाग नोंदवित असून असाच प्रतिसाद शहरी भागात मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आपणही केवळ एका दिवसाच्या सहभागात आनंद न मानता जमेल त्या ठिकाणी प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी वृक्षलागवड करून भविष्यासाठी शाश्वत आठवणी पेरून निसर्ग जपूया असा संकल्प करूया. महाराष्ट्राची हास्य जत्रा कुटुंबाने सहभागी होऊया दिलेल्या या अमूल्य योगदानासाठी त्यांचे कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा.