माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका सुरेख वाढवलेल्या पाहायला मिळत आहेत. नुकतेच यशच्या मनात देखील आता नेहा बद्दल प्रेम वाटू लागले आहे, त्यामुळे मालिकेची उत्कंठा अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेत सिम्मी चौधरी ही भूमिका विरोधी दर्शवली आहे तिच्या या कंपनीच्या कामातील अफरातफरीत तिला घारतोंडेची साथ मिळताना दिसते. वेळोवेळी हा घारतोंडे सिम्मीच्या चुकांवर पांघरून घालताना दिसतो आणि तिची मदत करताना देखील दिसतो. घारतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
अभिनेते दिनेश कानडे यांनी उत्कर्ष मंदिर मालाड येथील शाळेतून तसेच मुंबई युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आजवर त्यांनी हिंदी मराठी अशा नाटकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. रंगकर्मी या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती चाणक्य या नाटकातही ते महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. चाणक्य हे हिंदी नाटक दिल्लीतील संसद भवनात देखील सादर करण्यात आले होते. फक्त मराठी वाहिनीवरील साईबाबांच्या जीवनावर आधारीत मालिकेत आणि स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी राहुजी सोमनाथ ही व्यक्तिरेखा साकारली होती, या भूमिकेमुळे दिनेश कानडे यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली होती. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतही त्यांच्या वाट्याला तशाच धाटणीची भूमिका आलेली पाहायला मिळत आहे.
दिनेश कानडे हे बेस्ट मध्ये कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून त्यांनी कला क्षेत्रात देखील आपलं नाव कमावलं हे विशेष. बेस्ट तर्फे उत्तम कलाकार म्हणून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला होता. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका देखील लोकप्रियता मिळवताना दिसत आहे त्यामुळे मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांनाही विशेष भावला आहे. घारतोंडे ही भूमिका विरोधी जरी असली तरी शेफालीमुळे होणाऱ्या त्यांच्यातील गमतीजमती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. घारतोंडेच्या या भूमिकेसाठी आणि कलासृष्टीतील पुढील वाटचालीसाठी दिनेश कानडे यांना खूप खूप शुभेच्छा…