बाबा आणि मुलीचे अनोख्या प्रेमाने घट्ट विणलेलं खास नातं असतं. आई पेक्षाही वडिलांचं त्यांच्या मुलीवर जास्त प्रेम असतं. प्रत्येक मुलीला देखील तिच्या बाबाशिवाय दुसरं कुणीच आवडत नाही. बाबाच्या उबदार मायेच्या कुशीत मुलीला जितकं सुरक्षित वाटत असतं तितकं इतर कोणासोबत वाटणं शक्यच नाही. कारण मुली ह्या भूतकाळातील गोड आठवणी, वर्तमान काळातील आनंदी क्षण आणि भविष्य काळातील आधार आणि आश्वासन असतात..
अशाच एका प्रेमळ बाबाने आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रसिद्ध मराठी चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपली मुलगी सना हिच्या वाढदिवसाच्या मंगल दिवशी तिला शुभेच्छा दिल्या. या निमित्त मुलगा व्हावा असा अट्टहास करणाऱ्या पालकांना त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. सनाला शुभेच्छा देताना केदार म्हणाले, “मुलगी होणं हे किती भाग्याचं लक्षण आहे, हे ती आयुष्यात आल्याशिवाय समजणार नाही. वंशाला दिवा हवा म्हणून टाहो फोडणारे असंख्य आजूबाजूला पाहिले की कीव येते. मी तो नशिबवान नक्कीच आहे, ज्याला मुलगी आहे. स्वामी बळ देवो. शक्ती देवो की, तुझ्या स्वप्नातल्या प्रत्येक गोष्टी मी तुझ्यापर्यंत पोहोचवीन. स्वामी तुला बुध्दी देवो आणि पाठीशी राहोत..” मुलीच्या जन्मानंतर कुटुंबामध्ये अनेक सकारात्मक बदल घडतात, घराची संपूर्ण परिस्थितीच बदलून जात असते..
मुली इतक्या भाग्यशाली असतात कि त्या आपल्या कुटुंबाच्या प्रगतीचे मुख्य कारण बनतात. ती इवलीइवलिशी लक्ष्मीची पावले घरामध्ये आनंदाचे सुखकर वातावरण निर्माण करतात. मुली नेहमी तिच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालतात म्हणून त्यांच्यासाठी आदर्श पालक होणे गरजेचे आहे. मुलींनी मुलगी असण्याचा व ज्यांना मुलगी आहे त्यांनी गर्व बाळगला पाहिजे. जन्मानंतर घरात येणाऱ्या मुलीला लक्ष्मी आली असे मानतात त्या कोमल पावलांनी संपन्नता, ऐश्वर्य घेऊनच त्या येत असतात. आपल्या समजूतदारपणाने आई वडिलांना त्या कधीच कसलीच उणीव भासू देत नाहीत. असं म्हणतात मुली एका घराच्या नाही तर दोन दोन घरांचं भाग्य असतात. एक स्त्री घर आणि समाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम रित्या सांभाळू शकते. यासाठीच घर आणि समाजात प्रत्येक स्त्रीला सन्मानाची आणि आदराची वागणूक दिली जाते. वंशांचा दिवा म्हणून मुलगा हवा अशा भ्रमातून बाहेर येऊन मुला मुलीतील भेदभाव दूर होण्यासाठी स्वामी सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना.